Join us

"ताई, तू घाबरु नकोस, आम्ही आहोत"; राज्यभरातून मनसैनिकांचे मराठी महिलेला कॉल-मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 9:08 AM

सदर घडलेल्या प्रकाराचा व्हिडिओ तृप्ती यांनी पुन्हा सोशल मीडियावर शेअर केला.

मुंबई: मराठी माणसाला घर देणार नाही म्हणत मुलुंडमध्ये तृप्ती देवरुखकर यांना व त्यांच्या पतीला धक्काबुक्की करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तृप्ती यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत राजकीय पक्षांनी मराठीच्या नावावर राजकारण करणे बंद करावे, शिवाजी महाराजांचे नावही घ्यायचे बंद करावे असे म्हणत संताप व्यक्त केला होता.  

तृप्ती यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. यानंतर मनसेने आक्रमक होत तृप्ती यांना घर देण्यास नकार देणाऱ्यांना माफी मागायला लावली आहे. यानंतर सदर घडलेल्या प्रकाराचा व्हिडिओ तृप्ती यांनी पुन्हा सोशल मीडियावर शेअर केला. घर देण्यास नकार देणाऱ्यांनी माफी मागितल्यानंतर तृप्ती म्हणाल्या की, मी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकल्यानंतर मला अनेक जणांचे फोन आले. काही जणांची मला बळ देण्याचा प्रयत्न केला. काहींचे पाठिंबा देणारे फोन आल्याचे तृप्ती यांनी सांगितले.

तृप्ती पुढे म्हणाल्या की, तुम्ही या विषयाचे गांभीर्य समजून व्हिडिओ शेअर केला. त्यामुळे तुम्हा सर्वाची मी आभारी आहे. मला याठिकाणी काही जणांचे विशेष उल्लेख करावे असे वाटते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मनसैनिकांची खूप फोन आले. मी एखाद्या राजकीय पार्टीचे प्रमोशन करत नाहीय. पण हे सत्य आहे की, मला बरेच मेसेज, फोन हे मनसेच्या नेटवर्कमधून आले. मनसेचे कार्यकर्ते आली आणि त्यांनी सदर व्यक्तींना खाली बोलावून समज दिली. तसेच माझा हात पकडणाऱ्या त्या वयोवृद्ध माणसाच्या मुलाला दोन फटकेही मारले, अशी माहिती तृप्ती यांनी व्हिडिओद्वारे दिली.

दरम्यान, मराठी महिलेला कार्यालयासाठी जागा नाकारणाऱ्या गुजराती पिता पुत्रावर अखेर मध्यरात्री गुन्हा दाखल झाला आहे. तृप्ती देवरुखकर यांच्या तक्रारीवरुन मुलुंड पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. प्रवीण ठक्कर आणि त्यांचा मुलगा निलेश ठक्कर अशी या पिता पुत्राची नावं आहेत. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेशी संपर्क केला. तेव्हा तृप्ती देवरुखकर यांनी रात्री उशिरा मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरुन प्रवीण ठक्कर आणि निलेश ठक्कर यांच्याविरोधात कलम 341, 323, 504 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला. मुलुंड पोलिसांनी यातील दोन्ही आरोपींना रात्री ताब्यात घेतले आहे.

महिला आयोगाने दिले चौकशीचे आदेश- 

तृप्ती देवरुखकर यांना मराठी भाषिक असल्याच्या कारणावरून मुलुंड, मुंबई येथील शिवसदन सहकारी गृहनिर्माण संस्थेने सदनिका नाकारण्यात आली तसेच याबाबत प्रश्न उपस्थित केल्याने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचे वृत्त मध्यामांवरून प्रसारित होत आहे. भाषावार राज्य निर्मितीच्या आधारावर मुंबईसह  संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला आहे. असे असले तरी, महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत मराठी भाषिक महिलेला सदनिका नाकारली जाते, ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे ह्या घटनेची दखल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने घेतली असून याप्रकरणी सहकार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच प्रधान सचिव, गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई यांना चौकशी करून अहवाल मागविण्यात आला आहे.त्याचप्रमाणे याप्रकरणी संबंधित महिलेला भाषेच्या आधारे दुय्यम  वागणूक देऊन  मारहाण करण्यात आल्याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित पोलीस ठाणे यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.

टॅग्स :मनसेमुंबईराज ठाकरे