Join us

ओएलएक्सवर विक्रीसाठी ठेवलेला फोन लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 4:06 AM

अंधेरी पोलिसांकडून आरोपीला अटकलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ओएलएक्सवर विक्रीसाठी ठेवलेला स्मार्टफोन विकत घेण्याचा बहाणा करत तो घेऊन ...

अंधेरी पोलिसांकडून आरोपीला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ओएलएक्सवर विक्रीसाठी ठेवलेला स्मार्टफोन विकत घेण्याचा बहाणा करत तो घेऊन पळून जाण्याचा प्रकार अंधेरीत घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी विरारमधून निखिल दुर्गेश कुमार (२४) या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच फोनही हस्तगत करण्यात त्यांना यश मिळाले आहे.

तक्रारदार मोहम्मद पिक्चरवाला (२५) हे जोगेश्वरीचे रहिवासी असून त्यांनी त्याचा फोन विक्रीसाठी ओएलएक्सवर पोस्ट केला होता. त्याची किंमत देखील त्यांनी ७१ हजार रुपये नमूद केली होती. दरम्यान, कुमार याने ८ जून रोजी हा फोन खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केल्याने पिक्चरवाला यांनी त्याला स्वतःचा मोबाइल क्रमांक दिला. कुमारने त्यांच्याशी संपर्क साधत पिक्चरवाला यांची भेट घेतली आणि मोबाइल पाहण्यासाठी मागितला. तो पाहून झाल्यावर माझ्याकडे पैसे नाहीत, माझा भाऊ ते घेऊन येत आहे, असे त्यांना सांगत कुमार फोन घेऊन निघून गेला; पण आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पिक्चरवाला यांनी याप्रकरणी अंधेरी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार परिमंडळ १० चे पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय बेळगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश पिसाळ आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे कुमार याला विरारमधून अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून पिक्चरवाला यांचा मोबाइल देखील हस्तगत करण्यात आला आहे.