Join us

फोन टॅपिंग: रश्मी शुक्लांवर कारवाई?; विनापरवानगी टॅपिंगबद्दल मंत्रिमंडळात संतप्त प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 3:53 AM

रश्मी शुक्ला यांनी आयुक्त या नात्याने फोन टॅपिंगचा अहवाल तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्याकडे सोपविला होता

मुंबई : राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी काही मंत्री, अधिकाऱ्यांचे फोन शासनाची कोणतीही परवानगी न घेता टॅप केलेच कसे, त्यांच्या या कृत्याबद्दल त्यांच्यावर तत्काळ कायदेशीर कारवाई करावी़, अशी भावना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही मंत्र्यांनी बुधवारी व्यक्त केली. त्यामुळे शुक्ला यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

रश्मी शुक्ला यांनी आयुक्त या नात्याने फोन टॅपिंगचा अहवाल तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्याकडे सोपविला होता. त्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात फोन टॅपिंग केलेले होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा अहवाल केंद्रीय गृह सचिवांकडे सोपविला आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीला वरिष्ठ शासकीय अधिकारीदेखील उपस्थित असतात. त्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले आणि नंतर फोन टॅपिंगच्या विषयावर चर्चा झाली. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले की रश्मी शुक्ला यांनी परवानगी न घेताच हे फोन टॅपिंग केले. अनेक मंत्र्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचा संशय आहे. परवानगी एकाच्या नावाने घ्यायची आणि फोन मात्र भलत्याचेच टॅप करायचे असेही शुक्ला यांनी केले. खासगीपणाच्या अधिकाराचे हे उल्लंघन आहे.

आव्हाड यांनी दावा केला की गृह विभागाचे तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना आम्ही विचारणा केली तर त्यांनी रश्मी शुक्लांकडून फोन टॅपिंगसाठी परवानगी घेण्यात आलेली नव्हती असे स्पष्ट केले आहे. रश्मी शुक्ला यांनी विनापरवानगी फोन टॅपिंग केल्याबद्दल त्यांना विचारणा करण्यात आली होती आणि त्यांनी त्याबाबत माफीही मागितली होती. 

चोख प्रत्युत्तर द्या 

अँटिलिया-सचिन वाझे प्रकरण, परमबीर सिंग यांचे आरोप, रश्मी शुक्लांच्या अहवालाच्या आधारे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची कोंडी केली असताना आता त्यांना एकत्रितपणे जोरदार प्रत्युत्तर देण्याचा निर्धार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. 

फडणवीसांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर द्या, असे आदेशच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्याची माहिती आहे. मंत्री, अधिकाऱ्यांचे फोन टॅप केले जात होते. ही बाब अतिशय गंभीर असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी या बाबत चौकशीचे संकेत दिले.अनेक मंत्र्यांचे फोन टॅप करून सरकारला बदनाम करण्याचा कट होता. याची चौकशी करण्याची मागणी बहुतेक मंत्र्यांनी केली.

टॅग्स :रश्मी शुक्ला