Join us

मॅडम स्वत: संजय राऊतांचे फोन ऐकायच्या; 'त्या' जबाबानं रश्मी शुक्लांचा पाय खोलात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2022 9:34 PM

राऊत फोनवर कुणाचा उल्लेख साहेब म्हणून करतात, यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या

मुंबई: फोन टॅपिंग प्रकरणात पोलीस अधिकारी रश्मी शुक्लांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. शुक्ला स्वत: शिवसेना खासदार संजय राऊतांचे कॉल ऐकायच्या. राऊत कोणाला भेटतात, कोणत्या नेत्यांशी बोलतात, यावर लक्ष ठेवा. त्यांचे कॉल ऐकून रिपोर्ट द्या, अशा सूचना शुक्ला यांनी केल्या होत्या, असा जबाब एका अंमलदारानं नोंदवला आहे. त्यामुळे शुक्ला यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.

२०१९ मध्ये संजय राऊतांचा फोन टॅप करण्यात आला होता. जवळपास ६० दिवस राऊतांचा फोन टॅप केला गेला. राऊत फोनवर कुणाचा उल्लेख साहेब म्हणून करतात, यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना शुक्ला यांनी दिल्याचा जबाब पोलीस अंमलदारानं नोंदवला आहे. हा अंमलदार त्यावेळी गुप्तवार्ता विभागात कार्यरत होता. या प्रकरणी पोलिसांनी ७०० पानांचं आरोपपत्र तयार केलं असून त्यात १८ जणांचे जबाब आहेत. 

संजय राऊतांचा फोन टॅप करताना त्यांचा उल्लेख एस. रहाटे असा करण्यात आला होता. मात्र अंमलदारानं राऊतांचा आवाज ओळखला. रहाटे (राऊत) कोणासोबत बोलतात, कोणत्या घडामोडी, बैठकांचा उल्लेख करतात, मातोश्री आणि सह्याद्री अतिथीगृहाबद्दल काय म्हणतात, याची नोंद ठेवण्याचे आदेश शुक्लांनी दिले होते असं अंमलदारानं जबाबात म्हटलं आहे. 

फोन टॅपिंग प्रकरणात २ बड्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. मुख्य गुप्तचर अधिकारी, सहाय्यक आयुक्त यांच्याकडून फोन टॅपिंग सुरू होतं. राऊतांचे फोन स्वत: रश्मी शुक्ला ऐकायच्या. फोन टॅपिंग वैध आहे की अवैध याची माहिती आम्हाला नव्हती. आम्हाला केवळ आदेश देण्यात आले होते, असा जबाब अंमलदारानं नोंदवला आहे.

टॅग्स :संजय राऊतरश्मी शुक्ला