मुख्य सचिवांनी मुख्यमंत्र्यांकडे सोपवला अहवाल; रश्मी शुक्लांवर कारवाई होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 09:32 PM2021-03-25T21:32:34+5:302021-03-25T21:37:29+5:30
फोन टॅपिंग आणि गोपनीय अहवाल लीक केल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला अडचणीत
मुंबई: फोन टॅपिंग आणि गोपनीय अहवाल लीक केल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. रश्मी शुक्ला यांच्याबद्दलचा अहवाल मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवला आहे. या अहवालात काही गंभीर बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. त्यामुळ लवकरच शुक्ला यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसा निर्णय झाला असल्याची माहितीदेखील सुत्रांनी दिली आहे.
अपक्ष आमदारांना भाजपाच्या गळाला लावण्याचे रश्मी शुक्लांचे प्रयत्न; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
राज्य शासनाचा अतिशय गोपनीय अहवाल रश्मी शुक्ला यांनी लीक केल्याचा संशय कुंटेंनी व्यक्त केला आहे. हा आरोप सिद्ध झाल्यास शुक्ला यांच्यावर कठोर कारवाई होऊ शकते. रश्मी शुक्ला यांच्यावर गैरमार्गानं फोन टॅपिंग केल्याचा ठपकादेखील ठेवण्यात आला आहे. फोन टॅपिंग करून शुक्ला यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात काढलेले निष्कर्ष चुकीचे आहेत, असं कुंटेंनी अहवालात नमूद केलं आहे.
फोन टॅपिंग प्रकरणी अजित पवार संतापले, रश्मी शुक्लांची चौकशी अटळ?
रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग करून पोलिसांच्या बदल्यांबद्दल काढलेले निष्कर्ष चुकीचे आहेत. त्यांनी अहवालात नमूद केलेल्या कालावधीत बदल्याच झालेल्या नाहीत. त्यांनी उल्लेख केलेल्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्याच नाहीत. शुक्ला यांनी फोन टॅपिंगच्या अधिकारांचा गैरवापर केला. त्यांनी लोकांचे कौटुंबिक वाद, राजकीय घडामोडी, बड्या व्यक्तींची व्यवसायिक बोलणी ऐकली, असं कुटेंनी अहवालात नमूद केलं आहे.
रश्मी शुक्लांनी त्यांच्या अधिकारांचा चुकीच्या पद्धतीनं वापर करून लोकांचे फोन टॅप केले. हा प्रकार गंभीर आहे. यामुळे राईट टू प्रीव्हेसीचा भंग झाला आहे. त्यामुळे सरकार शुक्ला यांच्याविरोधात कारवाई करू शकतं, असं कुंटेंनी अहवालात म्हटलं आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आज महत्वाची बैठक पार पडली. बैठकीला जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, एकनाथ शिंदे आणि अनिल परब उपस्थित होते.