Aryan Khan Drugs Case : समीर वानखेडेंकडून फोन टॅपिंग - नवाब मलिक; बॉलिवूडच्या बदनामीबाबत मुख्यमंत्र्यांना चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 05:51 AM2021-10-27T05:51:33+5:302021-10-27T05:52:39+5:30
Nawab Malik : क्रूझ ड्रग्ज आणि आर्यन खान प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मलिक यांनी मंगळवारी सायंकाळी मुख्यमंत्री ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेतली.
मुंबई : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे हे अवैधपणे फोन टॅपिंग करत असून, मुंबई आणि ठाण्यातून हे टॅपिंग केले जात असल्याचा नवा आरोप राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी मंगळवारी केला आहे.
अमली पदार्थांच्या नावाखाली वर्षभरापासून जी कारवाई सुरू आहे, त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे.
या सर्व कारवायांबाबत मुख्यमंत्री स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.
क्रूझ ड्रग्ज आणि आर्यन खान प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मलिक यांनी मंगळवारी सायंकाळी मुख्यमंत्री ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेतली.
या भेटीनंतर मलिक म्हणाले, बॉलिवूडविरोधातील कारवायांबाबत मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे. बॉलिवूड ही हॉलिवूडनंतरची सर्वांत मोठी इंडस्ट्री आहे. लाखो लोकांचा रोजगार त्यावर अवलंबून असून, त्याचा जीडीपीत तीन ते चार टक्क्यांचा वाटा आहे.
देशाची, राज्याची संस्कृती जगभर पोहोचविण्याचे काम बॉलिवूड करते.
ही इंडस्ट्री, मुंबई बदनाम झाली तर त्याचा परिणाम लाखो लोकांच्या रोजगारावर होणार आहे. त्याने देशाचेच नुकसान होणार असल्याची चिंता मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात ते स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असल्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.
मुंबई पोलिसांनी नाेंदवला प्रभाकर साईलचा जबाब
ड्रग्ज क्रुझ पार्टीप्रकरणी केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) कारवाईनंतर आलेल्या तक्रारीवरून आता मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. तसेच याप्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांची मंगळवारी पोलीस उपायुक्तांकडून चौकशी करत त्यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे.
साईल यांनी मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. या आरोपानंतर आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत साईल यांनी सोमवारी मुंबई पोलीस मुख्यालय गाठून गुन्हे शाखेचे सहआयुक्त मिलिंद भांबरे यांना त्यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. तसेच साईल यांच्या मागणीनुसार त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.
साईल यांनी सहार पोलिसांकडे संपूर्ण माहिती देत तक्रार नोंदवली आहे. दुसरीकडे साईल यांच्या तक्रार अर्जानुसार, मंगळवारी त्यांना समन्स बजावून पोलीस उपायुक्त (परिमंडळ १) येथे हजर राहण्यास सांगण्यात आले. त्यानुसार, सायंकाळी ५ च्या सुमारास ते कार्यालयात हजर झाले.
नवाब मालिकांविरोधात तक्रार
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात भारतीय जनता युवा माेर्चाचे माजी अध्यक्ष मोहित भारतीय यांनी माझगाव दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी तक्रार केली आहे. क्रूझ ड्रग्जप्रकरणी आपली नाहक बदनामी करण्यात आल्याचे भारतीय यांचे म्हणणे आहे. भारतीय यांनी नवाब मलिक यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम ४९९ (बदनामी) ५०० (बदनामी केल्याबद्दल शिक्षा) अंतर्गत तक्रार केली आहे. भारतीय यांनी केलेल्या तक्रारीनुसार, मलिक यांनी ९ ऑक्टोबर रोजी कॉर्डेलिया क्रूझवर एनसीबीने टाकलेल्या छाप्याबद्दल पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी जाणुनबुजून भारतीय व त्यांच्या कुटुंबावर तथ्यहीन आरोप करून बदनामी केली. मलिक यांनी केलेल्या बदनामीमुळे आपली समाजातील प्रतिष्ठा धुळीस मिळाली, असा आरोप भारतीय यांनी केला आहे.