आदित्य ठाकरेंचा सुप्रिया सुळे अन् रोहित पवारांसोबतचा फोटो, ट्विट करुन म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 09:56 PM2019-11-24T21:56:41+5:302019-11-24T21:57:54+5:30
राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी शनिवारी संयुक्त पत्रकार परिषद घेत अजित पवारांजवळ असलेलं 54 आमदारांच्या
मुंबई - राज्याला राजकारणाला कलाटणी देणारी घटना शनिवारी घडली आणि महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळंच वळण लागलं. त्यानंतर शरद पवारांनी अजित पवारांची पक्षातून हकालपट्टी केली असली तरी महाविकास आघाडीच्या संभाव्य सरकारला तिलांजली देण्याचाच हा प्रकार घडला आहे. त्यामुळे अजित पवारांशिवाय महाविकास आघाडीचं एकरुप दाखविण्याचा प्रयत्न आता सर्वच नेत्यांकडून होत आहे.
राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी शनिवारी संयुक्त पत्रकार परिषद घेत अजित पवारांजवळ असलेलं 54 आमदारांच्या सह्याचं पत्र हे फसवणूक करून राज्यपालांना सादर केल्याचा आरोप शरद पवारांकडून करण्यात आला. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनीही भाजपावर जहरी टीका केली. त्यानंतर, आज पुन्हा उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीला हजेरी लावत सर्वांसोबत संवाद साधला. त्यावेळी, शरद पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, संजय राऊत, रोहित पवार यांच्यासह शिवसेना-राष्ट्रवादीचे नेतेमंडळी पाहायला मिळाली. हा क्षण कॅमेऱ्यात कैद करायला आणि तो शेअर करायलाही नेत्यांना स्वत:ला आवरता आले नाही.
खासदार सुप्रिया सुळे यांनी खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंसोबतचा फोटो शेअर केला. विशेष म्हणजे संजय राऊत यांनी हे ट्विट रिट्विट केलं आहे. तर, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरेंनीही आज सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यासमवेतचा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. महाराष्ट्रासाठी आम्ही सर्व एकत्र, असे कॅप्शन आदित्य ठाकरेंनी या ट्विटसोबत दिलंय. त्यामुळे अजित पवारांनी भाजपासोबत घरोबा केल्यानंतरही, आम्ही एकत्रच आहोत, हे दाखविण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून होताना दिसत आहे.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार अशी गर्जना करणाऱ्या संजय राऊतांना तोंडघशी पडावं लागलं. त्यामुळे संजय राऊतांनी आता या सरकारला अपघाती सरकार असं ट्विट करुन म्हटलं आहे.
Earlier today. All together for Maharashtra’s #MahaStrengthhttps://t.co/XyK49gDnPc
— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 24, 2019