लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भाजपने फक्त गांधीजींचा चष्मा घेतला, पण महात्मा गांधींची दृष्टी आणि देशाच्या प्रति दृष्टिकोन घेऊ शकले नाहीत, हे या देशाचे दुर्दैव आहे, अशा शब्दांत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी मोदी सरकारवर व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
मुंबई काँग्रेसतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाई जगताप बोलत होते. आदरांजली कार्यक्रमादरम्यान सकाळी ११ वाजता २ मिनिटांचे मौन पाळले गेले. कार्यक्रमाला मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड, मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. अजंता यादव, काँग्रेसचे आमदार अमिन पटेल, माजी आमदार मधू चव्हाण, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील व संदेश कोंडविलकर उपस्थित होते.
भाई जगताप म्हणाले की, आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन सादर केले. आम्ही मागणी केली आहे की, सकाळी ११ वाजता सायरन वाजवून २ मिनिटांचे मौन पाळणे, ही निव्वळ प्रथा नाही तर या देशाप्रति, महात्मा गांधी यांच्या प्रति आपले कर्तव्य आहे. मला अभिमान आहे की, आमच्या काँग्रेसचा कार्यकर्ता गांधीजींच्या विचारांना मानतो. तो त्यांच्या विचाराने चालतो.
चरणसिंग सप्रा म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी सकाळी ११ वाजता सायरन व्हायचा व दोन मिनिटांचे मौन पाळले जायचे. ज्या वेळेस सरकार बदलले, तेव्हा प्रथासुद्धा बदलली. आम्ही निवेदन देऊन ही प्रथा महाराष्ट्रात पुन्हा सुरू करावी, अशी मागणी केली आहे.
तर, मुंबईतील २२७ वॉर्डांमध्ये मुंबई काँग्रेसतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यात आली. सकाळी ११ वाजता दोन मिनिटांचे मौन पाळले गेले. मुंबई काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गांधीजींची भजने गात त्यांना आदरांजली दिली.