Anil Deshmukh Allegations : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले. समित कदम नावाच्या व्यक्तीला देवेंद्र फडणवीसांनी माझ्याकडे पाठवून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. खोटे आरोप करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी दबाव टाकला होता, असा गंभीर आरोप केला. मात्र आता ज्या समित कदम यांचा उल्लेख अनिल देशमुख यांनी केला त्यांचेच फोटो महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत असल्याचे समोर आलं आहे. देशमुख यांच्या आरोपानंतर काही ठोस पुरावे असतील तर न्यायालयात जा, असा सल्ला भाजपने दिला आहे.
शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. तीन वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे समित कदम या व्यक्तीला ५-६ वेळा पाठवलं होतं. त्याने खोट्या आरोपांचे प्रतिज्ञापत्र द्यायचं असं मला त्याने सांगितले. समित कदम आणि देवेंद्र फडणवीसांचे अतिशय घरगुती संबंध आहेत. समित कदम हा साधा नगरसेवकही नाही तरी फडणवीसांनी त्याला वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. त्याची पत्नी फडणवीसांना राखी बांधते, असे अनिल देशमुख म्हणाले. यावेळी देशमुख यांनी समित कदम आणि देवेंद्र फडणवीस यांचे एकत्र फोटो माध्यमांना दाखवले होते.
आता याच फोटोंवरुन भाजपने अनिल देशमुख यांना घेरलं आहे. समित कदम यांचे महाविकास आघाडीतल्या नेत्यांसोबत असलेले फोटो भाजप नेत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. समित कदम यांचा आदित्य ठाकरेंसोबतचा फोटो शेअर करत भाजप नेते माधव भंडारी यांनी भाष्य केलं आहे. अहो अनिल देशमुख फोटोवरूनच अर्थ काढायचे तर हा घ्या अजून एक फोटो. गृहमंत्री सारख्या अंत्यत जबाबदार पदावर राहिलेल्या व्यक्ताने असे बेजबाबदार पणे वागणं शोभत नाही. खरच काही ठोस पुरावे असतील तर न्यायालयात जा अकारण फेक नॅरेटीव्ह पसरवू नका, असे माधव भंडारी यांनी म्हटलं आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही समित कदम आणि शरद पवार यांचा फोटो शेअर केला आहे. "फोटोला फोटोने उत्तर आम्हालाही देता येते.यात कसला आला पराक्रम? महायुतीतील घटक पक्षाच्या नेत्याचा आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत फोटो नसेल तर आणखी कोणासोबत असेल?," असा सवाल चित्रा वाघ यांनी केला.