मुंबई : प्रकाशाचे संक्रमण सरळ दिशेत होते आणि त्यामध्ये एखादी घन वस्तू आली की, तिचे सावलीत परावर्तन होते, हा विज्ञानाचा साधा सरळ नियम आहे. याच नियमाचा वापर करून विद्यार्थ्यांचे भाषा शिक्षण आनंददायी करण्याचा प्रयत्न छायागोष्टीतून अनिता लुगडे या चेंबूर एज्युकेशन सोसायटी हायस्कूलच्या शिक्षिका करत आहेत. शिक्षण विभागाने त्यांच्या या प्रयत्नाची दखल घेतली असून, त्यांच्या ‘भाषिक विकास, हाच आमचा ध्यास’ या नवोपक्रमाची निवड राज्याच्या सर्वोत्कृष्ट ५ उपक्रमांमध्ये झाली आहे.शिक्षणातील अपेक्षित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांची भाषा समृद्ध हवी, यासाठी भाषा शिक्षण आनंददायी व्हायला हवे. म्हणूनच पाठ्यपुस्तकाच्या अध्यापनाव्यतिरिक्त इतर उपक्रमांची जाणीवपूर्वक पेरणी करणे आवश्यक आहे, असे मत लुगडे यांनी व्यक्त केले. याच आधारावर त्यांनी शाळेत येणाऱ्या आर्थिक, दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांची भाषा समृद्ध करण्याच्या दृष्टीने या उपक्रमाची मांडणी केली. मन माझे, चित्रकविता, छायागोष्टी, बालसभा, अभ्यासमित्र, पत्रास कारण की, शब्दफुले, वाचनयात्री, गाऊ आनंदे, पेन्सिल पपेट अशा सहा उपक्रमांतून त्यांनी पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना सुसंवाद साधण्यासाठी मदत केली.रोजच्या शाळेच्या वेळापत्रकाच्या नियोजनाशिवाय हे उपक्रम शाळेत घेतले जात असून, त्याला विद्यार्थी उत्तम प्रतिसाद देत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी त्यांना हव्या त्या शब्दांत अभिव्यक्त व्हावे, त्यांच्यातील वाचन, भाषण, लेखन, संभाषण कौशल्य वाढावे, त्यांची शाब्दिक संपदा वाढून मातृभाषेकडे त्यांचा ओढा टिकून राहावा, हा यामागील मूळ उद्देश असल्याचे लुगडे यांनी सांगितले.>अशी झाली स्पर्धाराज्यातील शिक्षकांनी सादर केलेल्या विविध उपक्रमांचा वापर अध्ययन-अध्यापनात करणे गरजेचे आहे. राज्यातील असे वेगळे उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांसाठी नुकतीच राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित केली होती.महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून १२० प्रस्ताव सादर झाले. राज्यातून ५ गटांत प्राप्त झालेल्या अर्जांची जिल्हा पातळीवर अहवालासह सादरीकरणासाठी चाचपणी करण्यात आली.जिल्हा स्तरावरील सर्वोत्कृष्ट नवोपक्रमांची राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड झाली. प्रत्येक गटातील सर्वोत्तम १०, याप्रमाणे ३९ नवोपक्रमांचे सखोल परीक्षण करून, यातून ५ उत्कृष्ट नवोपक्रम परीक्षकांकडून निवडण्यात आले.
छायागोष्टी, पेन्सिल पपेटमधून भाषेची गोडी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2019 5:33 AM