- सीमा महांगडेलोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : व्यवसाय शिक्षण संचालनालयामार्फत राज्यातील सरकारी, खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेशाची ऑनलाइनप्रक्रिया पूर्ण झाली असून, यंदा ७१ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यांच्यासाठी तब्ब्ल ९१ ट्रेड्सचा पर्याय संचलनालयाने दिला. यामध्ये फोटोग्राफर, एरॉनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (केमिकल प्लांट), मेकॅनिक कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्स, मेकॅनिक ऑटोबॉडी पेंटिंग, स्पिनिंग टेक्निशियन, विविंग टेक्निशियन अभ्यासक्रमांच्या जागांवर कमी प्रवेशक्षमता असूनही १०० टक्के प्रवेश झाले. तर टू, थ्री व्हिलर मेकॅनिक, फूड अँड ब्रिव्हरेज असिस्टंट, टेक्निशियन इन मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स अशा अभ्यासक्रमांस एकही प्रवेश झाला नाही.
टेक्निशियन इन मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स या अभ्यासक्रमाला मागील वर्षी १०० टक्के प्रतिसाद होता. यंदा एकही प्रवेश झाला नाही. ‘आर्किटेक्चरल ड्राफ्टमन’साठी मागील वर्षी ७३ टक्के प्रतिसाद होता, यंदा तो १५ टक्केच आहे. मागील वर्षी ८० टक्के प्रवेश झालेल्या टू व्हीलर-थ्री व्हिलर मेकॅनिक अभ्यासक्रमासाठी यंदा एकही प्रवेश झाला नाही. मेकॅनिक ऑटो बॉडी रिपेअर, टेक्निशियन मॅक्ट्रॉनिक्स, सिविंग टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमांच्या प्रवेशांतही कमालीचा चढउतार पहायला मिळत आहे. या सर्व ट्रेड्समधील काही ट्रेड अभियांत्रिकीतर काही बिगर अभियांत्रिकी मात्र व्यावसायिक स्वरूपाचे आहेत.
राज्यात आयटीआयच्या यंदा ४४ हजार जागा रिक्त राहिल्या. मागील वर्षी एकूण प्रवेशांपैकी आयटीआयमध्ये प्रवेशाचे प्रमाण ७९ टक्के होते. यंदा केवळ ७१ टक्के प्रवेश झाले. यंदाच्या एकूण प्रवेशांमध्ये शासकीय आयटीआय ८१, खासगी आयटीआयमध्ये ४९ टक्के प्रवेश आहेत. खासगी आयटीआयपेक्षा विद्यार्थी शासकीय आयटीआयलाच प्राधान्य देत असल्याचे स्पष्ट झाले.
लवकरच नवीन अभ्यासक्रमशहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थी हे रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याने आयटीआय अभ्यासक्रमास प्राधान्य देतात. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात दररोज नवनवीन तंत्रज्ञान येत असल्याने त्यानुसार उद्योगांची गरज पूर्ण करण्यासाठी राज्यातील आयटीआय संस्थांचे अद्ययावतीकरण आवश्यक आहे. त्यासाठी विभागामार्फत तयारी सुरू आहे. अनेक अभ्यासक्रम कालबाह्य झाले असून, लवकरच ते बदलून नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संचालनालयाने दिली.