Join us

छायाचित्रकाराची बॅग केली परत

By admin | Published: January 14, 2016 3:34 AM

चित्रपट क्षेत्रात छायाचित्रणाचे काम करणाऱ्या शशांक गोसावी या छायाचित्रकाराची तब्बल तीन लाखांच्या साहित्याची हरवलेली बॅग ‘लोकमत’च्या जाहिरात आणि विपणन विभागाचे सहाय्यक

मुंबई : चित्रपट क्षेत्रात छायाचित्रणाचे काम करणाऱ्या शशांक गोसावी या छायाचित्रकाराची तब्बल तीन लाखांच्या साहित्याची हरवलेली बॅग ‘लोकमत’च्या जाहिरात आणि विपणन विभागाचे सहाय्यक व्यवस्थापक बाबू पुथरी यांनी परत केली आहे. अवघ्या चोवीस तासांत हरवलेली बॅग जशीच्या तशी परत मिळाल्याने गोसावी यांनी पुथरी यांचे मनापासून आभारही मानले आहेत.बाबू पुथरी हे ‘लोकमत’च्या चिंचपोकळी कार्यालयात कार्यरत असून, ते वसई येथे वास्तव्यास आहेत. मंगळवारी ते नेहमीप्रमाणे काम आटपून घरी निघाले. दादरहून सायंकाळी ७.१५ वाजताची वसई लोकल पकडली. लोकलमधून उतरताना पुथरी यांना रॅकवर बॅग आढळून आली. लोकलमध्ये सहप्रवाशाकडे त्यांनी याबाबत विचारणा केली तेव्हा त्याने ती बॅग आपली नसल्याचे सांगितले. यावर त्यांनी बॅग उघडून पाहिली असता त्यात कॅमेरासह यासंबंधीचे साहित्य आढळून आले. बॅगमध्ये आढळून आलेल्या एका पावतीवर ‘पर्चेस पार्टी’ म्हणून शशांक गोसावी यांच्या नावासह त्यांचा दूरध्वनी क्रमांक आढळून आला. त्यानुसार पुथरी यांनी गोसावी यांना फोनवरून बॅगेसंदर्भात माहिती दिली. बॅगमधील साहित्याच्या खरेदी पावत्या घेवून गोसावी बुधवारी दुपारी ‘लोकमत’च्या चिंचपोकळी कार्यालयात दाखल झाले. यावेळी झालेल्या संवादांती बॅगमधील साहित्य तब्बल सुमारे तीन लाखांचे असल्याचे नमूद करत आपल्याकडील खरेदी पावत्याही दाखवल्या. दरम्यान, पुथरी यांनी दाखवलेल्या सहकार्याचे गोसावी यांनी कौतुक केले आहे. (प्रतिनिधी)