मुंबई : जवळच्या नातेवाइकाच्या लग्नात उठून दिसण्यासाठी साने कुटुंबाने घरातील सर्वच दागिने सोबत घेऊन लग्नमंडप गाठला. लग्नमंडपात हळदीच्या कार्यक्रमात फॅमिली फोटो काढण्यासाठी दागिन्यांची बॅग शेजारच्या खुर्चीत ठेवली. हळदीचे फोटोसेशन सुरू असताना सभागृहातून बोरीवलीच्या या साने कुटुंबाचे सुमारे २४ तोळ्यांचे दागिने चोरीला गेल्याची खळबळजनक घटना दादरमध्ये घडली.बोरीवली परिसरात भक्ती मिराज साने या कुटुंबीयांसोबत राहतात. दादरच्या वीर सावरकर नगर परिसरातील सभागृहात जवळच्या नातेवाइकाचे लग्न असल्याने ते तेथे गेले. बुधवारी सायंकाळी हळदीच्या कार्यक्रमात फॅमिली फोटो काढण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली. अशात त्यांनी घरातून निघतेवेळी सोबत घेतलेली बॅग जवळच्या खुर्चीत ठेवली. याच बॅगेतील पर्समध्ये त्यांचे २४ तोळ्यांचे दागिने होते. फोटोसेशन उरकल्यानंतर त्यांना बॅगेची आठवण झाली. तोपर्यंत बॅगेतून दागिने गायब झाले होते. चोरी झाल्याचे लक्षात येताच लग्नमंडपात धावपळ उडाली. दागिन्यांची शोधाशोध सुरू झाली.रात्री साडे नऊच्या सुमारास त्यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शिवाजी पार्क पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गंगाधर सोनावणे यांनी दिली.
हळदीचे फोटोसेशन पडले महागात, लग्नमंडपातून २४ तोळ्यांचे दागिने चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 6:27 AM