मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या विळख्यातून मुंबई आता हळूहळू सावरते आहे. मात्र वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, तिसऱ्या लाटेचाही धोका आहे. हा धोका ओळखून तिसऱ्या लाटेच्या नियंत्रणासाठी झोपडपट्टी परिसरातील ३०० हून अधिक फिजिशिअन्सची मदत घेण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.
मुंबई महानगरपालिका प्रशासनाने प्रत्येक विभागीय अधिकाऱ्यांना झोपडपट्टीच्या वस्तीतील डॉक्टरांशी समन्वय साधण्याची जबाबदारी दिली आहे. झोपडपट्टी परिसरातील डॉक्टरांनी तेथील स्थानिकांमध्ये कोरोनाची लक्षणे प्राथमिक पातळीवर ओळखून त्वरित निदान व उपचार प्रक्रियेत आणावेत अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे, गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांना गृह विलगीकरणात न ठेवता कोविड रुग्णालय वा केंद्रात भरती होण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
याविषयी, पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, तिसऱ्या लाटेच्या नियंत्रणासाठी पालिका प्रशासन आतापासून कठोर पावले उचलत आहे. त्यामुळे सध्या या पार्श्वभूमीवर विभागीय अधिकाऱ्यांना फिजिशिअन्ससोबत बैठक घेण्यास सांगितले असून, त्यात त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या वा नजीक असणाऱ्या झोपडपट्टी वस्तीतील रुग्णांबाबत सतर्कता बाळगणे, संसर्ग नियंत्रणासाठी उपाययोजना सांगणे आणि प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे. पहिल्या लाटेत झोपडपट्टीच्या वस्तीत कोरोनाचा उद्रेक झाला होता, मात्र योग्य व्यवस्थापनांती दुसऱ्या लाटेत नियंत्रण मिळविता आले. त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ही योग्य खबरदारी बाळगणे गरजेचे आहे, त्याप्रमाणे फिजिशिअन्सना सूचना देण्यात आल्या आहेत.
शहर उपनगरातील झोपडपट्टीच्या वस्तीत ३००-३५० फिजिशिअन्स आहेत. त्यामुळे परिसरातील स्थानिकांच्या प्रकृतीविषयी फिजिशिअन्स जाणून असतात, तसेच सहव्याधींविषयीही माहिती असते. परिणामी, या फिजिशिअन्सच्या सहकार्याने झोपडपट्टीत कोरोना नियंत्रण व जनजागृतीवर भर देण्यात येणार आहे.