मध्य रेल्वे हे एक अजब रसायन आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईला थेट जोडणारा राजमार्ग मध्य रेल्वेवरूनच जातो. अशा या मध्य रेल्वेवर मुंबई परिसरात अनेक छोटी-छोटी उपनगरे आहेत. या उपनगरांना जोडणारी उपनगरीय सेवा म्हणजे मुंबईकरांसाठी जीवनवाहिनीच. अशा या उपनगरांचे स्वतंत्र वैशिष्ट्य असते. त्यातील एक आहे टिळकनगर स्थानक. हार्बर मार्गावरचे टिळकनगर हे स्थानक तसे छोटेखानी; परंतु, याचा मान मोठा. कारण या स्थानकाला टर्मिनसचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे उत्तर वा दक्षिण भारतात जाणाऱ्या अनेक गाड्यांचे उगमस्थान हेच स्थानक असते. या स्थानकावर दोन प्लॅटफॉर्म आहेत जे उत्तर आणि दक्षिणेकडे जाणाऱ्या रेल्वेमार्गाला सेवा देतात. या स्थानकातून दररोज ४० ते ५० हजार प्रवाशांची ये-जा असते. विशेषत: लोकमान्य टिळक टर्मिनसवर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. हे स्थानक टिळकनगरच्या राजासाठी प्रसिद्ध आहे. टिळकनगरमध्ये मराठी हिंदू बांधवांचे प्रमाण जास्त आहे. तेथे विविध धार्मिक कार्यक्रम नियमितपणे आयोजित केले जातात. इथे ख्रिश्चन लोकसंख्याही लक्षणीय आहे. १९७७ मध्ये सह्याद्री क्रीडा मंडळाची स्थापना झाली आहे. सह्याद्री क्रीडा मंडळाचा टिळकनगरचा राजा हा भव्य देखावे, पारंपरिक पद्धतीने बाप्पांची स्थापना आणि तेवढंच देखणं विसर्जन, समर्पित कार्यकर्त्यांची फौज आणि जोडीला शिस्त आणि उत्तम नियोजन यासाठी प्रसिद्ध आहे. जगप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर, तिरूपती बालाजी मंदिर, शनिवारवाडा, राजस्थानमधली प्रसिद्ध आणि भव्य मंदिरे, मोठे राजवाडे, वाराणशीची गंगा आरती, जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान, मुलांसाठी डिस्नेलँड असे अनेक कल्पक आणि भव्य देखावे मंडळाने साकारले आहेत.
स्टेशनची चित्तरकथा: टिळकनगरच्या राजाचे माहेरघर
By नितीन जगताप | Published: April 10, 2023 9:38 AM