मुंबईतील चित्र: अपघाती मृत्यूंमध्ये पादचारी, दुचाकीस्वारांचे ९० टक्के प्रमाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 07:50 AM2021-01-25T07:50:34+5:302021-01-25T07:50:48+5:30
सर्व पदपथ मोकळे करणे गरजेचे
मुंबई : सध्या रस्ते सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. पण गेल्या काही वर्षात मुंबईत अपघाती मृत्यूंमध्ये पादचारी आणिदुचाकीस्वारांचे मृत्यूचे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत आहे, असे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितले.
याबाबत अविनाश ढाकणे म्हणाले की, शहरात एकूण ९० टक्के रस्ते अपघात मृत्यूंमध्ये पादचारी, दुचाकीस्वार आणि सायकलस्वार यांचा समावेश आहे. ते म्हणाले, २०१५ पासून पादचाऱ्यांच्या मृत्यूंमध्ये ४० टक्क्यांनी घट झाली असली, तरी रस्त्यावर मोठा गट अपघाती मृत्यूंचा बळी ठरत आहे. मृत्यू कमी करण्यासाठी वेग व्यवस्थापन आणि पादचारी पायाभूत सुविधा सुधारणा महत्त्वाच्या आहेत. रस्त्यावर पादचाऱ्यांना प्राधान्य देण्याची गरज आहे. स्थानिक सरकारने त्यांच्या सुरक्षिततेची खात्री केली पाहिजे. सर्व पादचारी मार्ग मोकळे असले पाहिजेत आणि लोकांना अधिक चालण्यासाठी आणि कमी रस्ते वाहतुकीचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे.
जर चांगले फूटपाथ असतील तर वाहनांचा वापर कमी होईल. आज रस्त्यावरून चालणे धोकादायक आहे, त्यामुळे लोक दोन ते तीन किलोमीटर अंतरावर ऑटोरिक्षा घेतात. जर चांगले फूटपाथ असतील तर ते अंतर पार करण्यासाठी चालण्यास प्राधान्य दिले जाईल. यामुळे चांगले आरोग्य, रस्त्यावर वाहनांचा कमी वापर, कमी प्रदूषण आणि पादचाऱ्यांना होणारे अपघात कमी होतील, असेही ते म्हणाले.
अहवाल लवकरच सादर
मुंबईत युनायटेड वे मुंबईतर्फे कोणत्याही तासाला आणि वेगात किती वाहने येतात हे जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. लवकरच अंतिम अहवाल सादर करण्यात येईल, असे युनायटेड वे मुंबईचे संचालक अजय गोवले यांनी सांगितले.
वाहतूक विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात १,३२४ अपघात प्रवणक्षेत्र असून त्यापैकी ५८ अपघातप्रवण क्षेत्र मुंबईत आहेत.
आरटीओ आणि वाहतूक पोलीस (शहर आणि महामार्ग) अपघातप्रवण क्षेत्रातील अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवत आहेत. - अविनाश ढाकणे, परिवहन आयुक्त