दिपक मोहिते ल्ल वसईवसई-विरार शहर महानगरपालिकेच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणूकीची धामधूम सुरु झाली आहे. राजकीय पक्षांनी विभागवार मेळावे आयोजित करण्याचा धडाका सुरु केला. परंतु मजलीस या निवडणुकीत उतरली तर, या निवडणुकीतील सर्व समीकरणे साफ बदलून जाणार आहेत. मुस्लिम बहुल असलेल्या नालासोपारा पश्चिम, वसई पाचूबंदर, नालासोपारा पूर्व आचोळे, पेल्हार, वसई-पापडी भागात आॅल इंडिया मजलीस इत्तेहाद मुसलमीन ही आपले उमेदवार उभे करणार असल्याचे वृत्त आहे. नालासोपारा पूर्व भागातील दलित - व्होट बँकेवर मजलीसची मदार आहे. जनता दल या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार उतरविण्याची जोरदार तयारी करीत आहे. बहुजन विकास आघाडी, सेना-भाजपा युती तर कधीच कामाला लागली आहे. त्यांना केवळ निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची प्रतिक्षा आहे. दुसरीकडे सत्ताधारी बहुजन विकास आघाडीला घेरण्याची एकही संधी युती सोडतांना दिसत नाही. मोर्चे, धरणे आंदोलने केली जात आहेत. सेनेचे वरिष्ठ नेते विरार येथे येऊन गेले. त्यांच्या जाण्यानंतर येथे वाद उफाळला असून दोन पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झाली. बहुजन विकास आघाडीने मात्र विभागवार उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. अत्यंत नियोजनबद्धरित्या ते यंत्रणा राबवत आहे.राज्यात सेना-भाजपयुती सत्तेत असली तरी, वसई-विरार उपप्रदेशांमध्ये या दोघांमध्ये सख्य नाही. खासदार अॅड. चिंतामण वनगा व पालकमंत्री विष्णू सवरा या दोघांबाबत सेनेच्या कार्यकर्त्यामध्ये प्रचंड नाराजी आहे. वसई पूर्व भागातील सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याचा या दोघांच्या कामाबाबत आक्षेप आहेत. पूर्वीच्या डहाणू लोकसभा व वाडा विधानसभा क्षेत्रात वसई पूर्वच्या भागाचा समावेश होतो. त्यावेळी या विभागाच्या विकासाकडे दोघांनी कधीही लक्ष दिले नाही, असा आरोप शिवसैनिक तसेच नेत्यांकडून होत आहे. त्यामुळे युती झाली तरी ती केवळ कागदावरच होईल. प्रत्यक्षात उतरणार नाही. सध्या तरी येथील भाजपा नेत्यांनी ‘एकला चलो रे’ ची भूमिका स्वीकारली आहे. या निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडीने जोरदार तयारी चालवली आहे. किमान १०० जागा जिंकण्याचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून नेत्यांनी उमेदवारीचे निकष ठरवले आहेत. आरक्षणामुळे बाद झालेल्या माजी नगरसेवक व नगरसेविकांकडे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आणण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. विरोधकांनी सध्यातरी पाणी टंचाई व २१ गावांच्या विकासाचे अधिकार अशा दोन प्रश्नांवर रान उठविले आहे.४तिकीटसाठी इच्छुकच नसल्यामुळे काँग्रेसमध्ये सध्या शुकशुकाट आहे. पक्षश्रेष्ठीही निवांत आहेत. जागा भरपूर आणि उमेदवाराची संख्या अपुरी अशी काहीशी अवस्था या दोन्ही पक्षांची झाली आहे. लोकसभा, विधानसभा, जिल्हापरिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये निकाल कोरा राहिल्यामुळे कार्यकर्ते तिकिट मागण्यासाठी पुढे येताना दिसत नाहीत. या निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांनी सपाटून मार खाल्याने कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचले आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणुका लढविण्यासाठी उमेदवार मिळणे त्यांना कठीण झाले आहे.
मजलीसमुळे महापालिका निवडणुकीचे चित्र बदलणार
By admin | Published: April 28, 2015 10:37 PM