चित्रनगरीतील गोळीबार पूर्ववैमनस्यातून

By admin | Published: May 26, 2015 02:07 AM2015-05-26T02:07:50+5:302015-05-26T02:07:50+5:30

शिवसेना चित्रपट सेनेचे चिटणीस व व्यावसायिक श्रीकांत ऊर्फ राजू शिंदे (४२) यांच्यावरील प्राणघातक हल्ल्यात सहभागी असलेल्या तिघांना गजाआड केले.

Picture shooting firing | चित्रनगरीतील गोळीबार पूर्ववैमनस्यातून

चित्रनगरीतील गोळीबार पूर्ववैमनस्यातून

Next

मुंबई : शिवसेना चित्रपट सेनेचे चिटणीस व व्यावसायिक श्रीकांत ऊर्फ राजू शिंदे (४२) यांच्यावरील प्राणघातक हल्ल्यात सहभागी असलेल्या तिघांना गजाआड केले. तर मुख्य सूत्रधारासह किमान तीन आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती आज आरे सब पोलिसांनी जाहीर केली. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून घडल्याचे आतापर्यंतच्या तपासातून पुढे आल्याचा दावा पोलीस करतात.
२२ मेला चित्रनगरीत शिंदेंवर गोळीबार झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी सुमित तळेकर, योगेश कोकणे आणि जुगल दोडीया या तिघांना अटक केली. घटनास्थळाजवळून मिळालेली बाईक सुमितची आहे. घर विकून त्याने ही बाईक विकत घेतली होती. तर केबल व्यावसायिक असलेल्या कोकणेच्या जोगेश्वरीतल्या कार्यालयातून १ रिव्हॉल्वर, दोन मॅगझिन आणि १० जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला. शिंदेंवरील गोळीबारात टोळीने वापरलेले शस्त्र हेच असावे, असा अंदाज पोलिसांना आहे. तूर्तास हा शस्त्रसाठा तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळा, बॅलेस्टिक तज्ज्ञांकडे धाडण्यात आला आहे.
या तिघांव्यतिरिक्त सुरेश गायकवाड, संदेश खैरनार आणि राकेश कांबळे या तीन आरोपींची ओळख पटली आहे. यापैकी गायकवाड हा या हल्ल्याचा मास्टर माइंड असल्याचे पोलिसांना समजले आहे. उच्चशिक्षित, बँकेत मोठ्या हुद्द्यावरील नोकरी असूनही गायकवाडला गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे.
चित्रनगरीत मक्तेदारी असलेल्या शिंदेंकडे गायकवाड, खैरनार, कांबळे व कोकणे काम मागण्यासाठी गेले होते. आपल्या वाटयाला येणारी काही कंत्राटे आम्हाला द्यावीत, आम्हालाही येथे व्यवसाय करण्याची संधी मिळावी अशी मागणी या चौघांनी शिंदेंना केली. त्या बैठकीत शिंदेंसोबत चौघांचा वाद झाला. यातून शिंदे व त्यांच्या कामगारांनी या चौघांना बेदम मारहाण केली. त्यात गायकवाडला जास्त मार बसला होता. तेव्हा गायकवाड आणि खैरनारने शिंदेंच्या हत्येचा कट आखला, अशी माहिती पुढे आल्याचे पोलीस सांगतात.
शिंदेंवर गोळया झाडणारा शूटर कोण, शूटरला बाईकवर बसवून पळणारा बाईकस्वार कोण हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अप्पर आयुक्त फत्तेसिंग पाटील यांच्यानुसार गुन्हयात कोणाची भुमिका काय याबाबत चौकशी सुरू आहे. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गायकवाड, खैरनार यांच्यापैकीच एक शूटर असावा, असा अंदाज पोलीस वर्तवित आहेत. (प्रतिनिधी)

च्फक्त मारहाणीचा बदला घेण्यासाठी हा गोळीबार झाला, ही बाब अद्याप आरे पोलिसांच्या गळी उतरलेली नाही. शिंदे यांच्या व्यवसायाचा पसारा मोठा होता. चित्रनगरीतील सेट उभारणीपासून मजूर पुरवणे, सुरक्षा पुरवणे ही कंत्राटेही त्यांच्याकडेच होती. ते केबल व्यवसायातही आहेत.
च्त्यामुळे त्यांच्या हत्येने कोणाकोणाला फायदा होऊ शकेल, शिंदे यांचे चित्रनगरीतील व बाहेरील व्यावसायिक स्पर्धक कोण, याचाही शोध पोलीस घेत आहेत. बदला घेण्याच्या ईर्षेने पेटलेल्या या तरुणांना कोणी फूस लावली याचा शोध आरे पोलीस घेत आहेत.

Web Title: Picture shooting firing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.