व्हीलन तुरुंगात जात नाही तोपर्यंत पिक्चर सुरू राहणार; नवाब मलिकांचा समीर वानखडेंना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 07:48 AM2021-11-08T07:48:50+5:302021-11-08T07:49:07+5:30
वानखेडेंच्या प्रायव्हेट आर्मीसाठी ललित हॉटेल होते बुक
मुंबई : माझे आरोप खोटे आहेत, असे सांगत सध्या एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हसत आहेत. पण नंतर ते रडणार आहेत. सध्या जो खेळ सुरू आहे, त्याला इंटरव्हल नाही. जोपर्यंत व्हिलन तुरूंगात जात नाही तोपर्यंत पिक्चर संपणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी रविवारी दिला.
कदिवाळीनंतर हॉटेल ललितमधील रहस्ये उघड करणार असल्याचा इशारा मलिक यांनी दिला होता. त्यानुसार रविवारी पत्रकार परिषद घेत मलिक म्हणाले की, समीर वानखडे, त्यांचा वाहनचालक माने, व्ही. व्ही. सिंग आणि आशिष रंजन ही चौकडी एनसीबीमध्ये कार्यरत आहे. ही चौकडीच सर्व खेळ करत आहे. ललित हॉटेल सात महिने बुक होते. तिथूनच ही प्रायव्हेट आर्मी काम करत होती. विलास भानुशाली, धवल भानुशाली, सॅम डिसूजा अशा अनेक लोकांची तिथे ये-जा होती. तिथे मुलीही येत होत्या, ड्रग्ज घेतले जात होते.
हॉटेल ललितमध्ये शराब, शबाब आणि कबाब सुरू होते. फक्त नवाब तिथे नव्हता, असे सांगतानाच तिथे सर्व तुमचेच लोक होते. वानखेडेच्या प्रवक्त्याने म्हणजेच मोहित कंबोज यांनीच तशी माहिती दिल्याचा टोला नवाब मलिक यांनी लगावला. आर्यन खानच्या अटकेनंतर मी एनसीबीची पोलखोल करण्यास सुरूवात केली. नवाब मलिकने बोलायचे थांबवले नाही तर तुझा मुलगा दीर्घकाळासाठी आत जाईल, अशा शब्दात शाहरूख खानला घाबरविण्याचा प्रयत्न झाला, असा दावा मलिक यांनी केला. वानखेडे कुणाला फोन करतात, कुणाला धमकावतात, हे मी नंतर उघड करेन, असा इशाराही मलिक यांनी दिला.
दफनभूमीबाहेर वानखेडे-कंबोज भेट
समीर वानखेडे आणि मोहित कंबोज हे एकमेकांना चांगल्याप्रकारे ओळखतात. मुंबईत मोहित कंबोज यांच्या मालकीची बारा हॉटेल्स आहेत. स्वत:च्या हॉटेल्सच्या आसपास असणारी इतर हॉटेल्स बंद पाडण्यासाठी समीर वानखेडे यांच्या माध्यमातून खोटे गुन्हे लादले जात.
मुंबईत कुणाल जानीच्या मालकीचे बास्कीन हे हॉटेल आहे. उच्चभ्रू वर्गात हे हॉटेल लोकप्रिय आहे. मात्र, मोहित कंबोजने याच परिसरात ओपा हॉटेल सुरू केले. बास्कीन हॉटेल बंद पाडण्यासाठी वानखेडे यांच्या माध्यमातून कुणाल जानीला खोट्या प्रकरणात अडकवल्याचा आरोपही मलिक यांनी केला.
माझ्या आरोपानंतर ७ ऑक्टोबरला मुंबईतील ओशिवरा दफनभूमीच्या बाहेर समीर वानखेडे यांनी मोहित कंबोज यांची भेट घेतली होती. मात्र, या परिसरातील सीसीटीव्ही बंद असल्यामुळे याचा व्हिडिओ माझ्याकडे नाही; परंतु या परिसरातील लोकांनी ओशिवरा दफनभूमीच्या बाहेर अशी भेट झाल्याचे सांगितले आहे. वानखेडे यांना याची कुणकुण लागल्यानंतर त्यांनी घाबरून मुंबई पोलिसांकडे कोणीतरी माझा पाठलाग करत असल्याची तक्रार केल्याचा दावाही नवाब मलिक यांनी केला.
सुनील पाटील नव्हे, तर कंबोजच मास्टरमाईंड
सुनील पाटील हाच आर्यन खान प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा दावा कंबोज यांनी केला. यावर, पाटील नव्हे, तर कंबोज हेच मास्टरमाईंड असल्याचा प्रत्यारोप मलिक यांनी केला. सुनील पाटील यांना मी आयुष्यात कधीच भेटलो नाही. पाटील यांचे भाजप नेते अमित शहांबरोबरचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचे फोटो व्हायरल होत आहेत. आम्ही फोटोंवरून आरोप करत नाही. कोणत्या पक्षाचा व्यक्ती आहे हे आम्ही सांगत नाही, पण सुनील पाटीलसुद्धा फ्रॉड असून वानखेडेंच्या प्रायव्हेट आर्मीचा प्लेअर आहे, असा दावा त्यांनी केला.
माझ्या ६ ऑक्टोबरच्या पत्रकार परिषदेच्या दोन तासांनंतर सुनील पाटीलचा मला फोन आला होता. मी धुळ्याहून बोलतोय, मी तुम्हाला या पत्रकार परिषदेबाबत अधिक माहिती देऊ शकतो, असे सुनील पाटील म्हणाला होता. त्यावर मी त्यांना मुंबईत यायला सांगितले होते. दुसऱ्या पत्रकार परिषदेवेळीही फोन आला. जेव्हा विजय पगारे माझ्याकडे आले तेव्हाही पाटील आले नाहीत.
पगारे यांच्यासोबत भंगाळे नावाची व्यक्ती होती. त्याच्या फोनवरून पाटीलशी चर्चा केली. तुम्ही घाबरू नका. मलिकसाहेब तुम्हाला पोलिसांच्या हवाली करतील, असं भंगाळेंनी पाटील यांना सांगितले. मला नंबर दिला तेव्हा मी डायल केला असता पाटीलचाच नंबर होता. पोलिसांना शरण या, सत्य सांगा असे मी त्याला सांगितले. त्यावर, मी सध्या गुजरातला आहे. मला इथे थांबविण्यात आले आहे. मी कोणत्याही परिस्थितीत येईन, असे ते म्हणाले, पण अजून ते आले नाहीत, असे मलिक यांनी सांगितले.