मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सवानिमित्त महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे मुंबई महानगरांतील सर्व महापालिका शाळांतील तसेच खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांसाठी माझी मुंबई या विषयावर आधारित आणि महापौर आयोजित बालचित्रकला स्पर्धा २०१९-२०२० चे उद्घाटन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते जी/दक्षिण विभागातील लोअर परळच्या जी.के. मार्गावरील सुनीता दत्ताजी नलावडे मनोरंजन उद्यानात रविवारी सकाळी करण्यात आले.
या स्पर्धेत संपूर्ण मुंबईतून ५९ हजार ६२१ बालचित्रकारांनी सहभाग घेतला. मुंबईतील महापालिकेची उद्याने-मैदाने बालचित्रकारांच्या उपस्थितीने व त्यांच्या सुरेख चित्रांनी जणू फुलून गेली. सकाळी ८ ते ११ या वेळेदरम्यान आयोजित या स्पर्धेकरिता मुंबई शहर व उपनगरांतील विभागनिहाय एकूण ४५ उद्याने व मैदाने निश्चित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारे, त्यासोबतच मुंबईविषयी त्यांच्या मनात दडलेली चित्रे कागदावर चितारली जातील, याचा सर्वंकष विचार करून गटनिहाय विषय निश्चित करण्यात आले होते. एकूण चार गटांत ही स्पर्धा संपन्न झाली.