Join us

चित्रांतून साकारली ‘माझी मुंबई’

By admin | Published: January 11, 2016 2:19 AM

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे महापालिका शाळांतील, तसेच खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांतील

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे महापालिका शाळांतील, तसेच खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘माझी मुंबई’ चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. रविवारी झालेल्या या स्पर्धेत तब्बल ५६ हजार ३८८ बालचित्रकार सहभागी झाले. महापालिकेची उद्याने-मैदाने बालचित्रकारांच्या उपस्थितीने व त्यांच्या सुरेख चित्रांनी फुलून गेली होती.सकाळी ८.३० ते ११.३० दरम्यान आयोजित या स्पर्धेकरिता मुंबई शहर व उपनगरांतील विभागनिहाय एकूण ३९ उद्याने व मैदाने निश्चित करण्यात आली होती. ही स्पर्धा गेल्या पाच वर्षांपासून आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धेतील प्रत्येक गटात प्रथम (२५ हजार), द्वितीय (२० हजार) व तृतीय विजेते (१५ हजार) आणि १० उत्तेजनार्थ (५ हजार प्रत्येकी) या प्रमाणे तिन्ही गटांतून मिळून एकूण ३९ विजेत्यांना रोख पारितोषिके व सन्मानचिन्हे देण्यात येणार आहेत. पारितोषिकांची एकूण रक्कम ३ लाख ३० हजार रुपये आहे. निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.स्पर्धेतील विजेत्यांची चित्रे मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी होर्डिंग्जच्या स्वरूपात झळकावण्यात येतील, जेणेकरून ती सर्व मुंबईकरांपर्यंत पोहोचतील. महापालिकेच्या संकेतस्थळावरदेखील ही चित्रे उपलब्ध करून देण्यात येतील. (प्रतिनिधी)