सात मतदारसंघांचे चित्र अद्याप अस्पष्ट; काँग्रेसचे तीन, तर भाजपाचे दोन उमेदवार अनिश्चित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 06:13 AM2019-03-27T06:13:32+5:302019-03-27T06:13:56+5:30
सात लोकसभा मतदारसंघांमध्ये कुठे आघाडीचे तर कुठे युतीचे उमेदवार न ठरल्याने लढतीचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. काँग्रेसच्या तीन, भाजपाच्या दोन तर राष्ट्रवादी आणि बहुजन विकास आघाडीच्या प्रत्येकी एका उमेदवाराच्या नावाची अद्याप घोषणा झालेली नाही.
मुंबई : सात लोकसभा मतदारसंघांमध्ये कुठे आघाडीचे तर कुठे युतीचे उमेदवार न ठरल्याने लढतीचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. काँग्रेसच्या तीन, भाजपाच्या दोन तर राष्ट्रवादी आणि बहुजन विकास आघाडीच्या प्रत्येकी एका उमेदवाराच्या नावाची अद्याप घोषणा झालेली नाही.
ईशान्य मुंबईत भाजापा खासदार किरीट सोमय्या यांना अद्याप उमेदवारी मिळालेली नाही. त्यांच्याऐवजी माजी नगरसेवक प्रवीण छेडा यांच्या नावाची चर्चा आहे. उत्तर मुंबईत काँग्रेसचे उमेदवार ठरलेले नाहीत. तेथे भाजपाचे गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात काँग्रेस अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर हिला मैदानात उतरवू शकते.
पुणे मतदारसंघात काँग्रेसकडून मोहन जोशी आणि प्रवीण गायकवाड यांच्या नावांची चर्चा आहे. भाजपातर्फे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट उमेदवार आहेत. सांगलीत काँग्रेसच्या उमेदवारीचा तिढा कायम आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ही जागा सोडणार का, हे अद्याप अस्पष्ट आहे.
काही ठिकाणी अधिकृत घोषणा बाकी
माढा मतदारसंघात भाजपाची उमेदवारी काल पक्षात आलेले रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना मिळणार हे जवळपास स्पष्ट आहे. पण त्याबाबतची अधिकृत घोषणा झालेली नाही. पालघरमध्ये शिवसेनेने भाजपाचे खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी देऊन अनिश्चितता संपविली, पण बहुजन विकास आघाडीकडून कोण याबाबतची उत्सुकता कायम आहे. माजी खासदार बळीराम जाधव यांचे नाव जवळपास नक्की आहे. रावेरमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार ठरता ठरेना अशी स्थिती आहे. रवींद्र पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी यांच्या नावाची चर्चा आहे.