लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ चे काम वेगाने सुरू आहे. आणखी एक काम यशस्वीरीत्या पार पडले आहे. मेट्रो २ अ च्या डहाणूकरवाडी मेट्रो स्टेशनजवळ पियर कॅप उभारण्यात आले आहे. ६० टन वजनाचे हे पियर कॅप मेट्रो २ अ प्रकल्पातील या भागाचा अविभाज्य भाग आहे.
मुंबई इन मिनिट्स हे स्वप्न साकार करण्यासाठी प्राधिकरण वेगाने काम करीत आहे. चारकोप मेट्रो डेपो येथेही प्रत्यक्ष साईटवर प्रशिक्षण सत्रे सुरू आहेत. हैदराबाद येथे सिम्युलेटर ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण स्टेशन कंट्रोलर्स आणि ट्रेन ऑपरेटर्स यांना दिले जात आहे. लिफ्ट, स्पीड टेस्ट आणि एस्कलेटर स्कर्ट फिक्सिंगची अंतर्गत तपासणी केली जात आहे. मेट्रो गाड्यांच्या पाॅवरिंगसाठी ओएचई देखभालीचे प्रशिक्षण दिले जात आहे. टेक्निकलपासून ऑपरेशनलपर्यंतच्या सर्व टीम मेट्रो चाचण्यांसाठी परिश्रमपूर्वक तयार होत असून, यात आणखी वाढ होणार आहे. मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर गाड्या आणि स्थानकांसाठी योग्य वीजपुरवठा होईल याची खात्री केली जात आहे.
चारकोप मेट्रो डेपो येथे मेट्रो २ अ आणि ७ करिता ट्रॅक्शन पॉवर प्रदान करण्यासाठी रिसीव्हर सबस्टेशन (आरएसएस) बसविण्यात आले आहेत. मेट्रो-२ अ वर ५८.८६ टन वजनाचे एक स्टील गर्डर उभारण्यात आले आहे. तर पोईसर नदीच्या जवळ ७५ मीटरचा स्टील स्पॅन बसविण्यात आला आहे. तसेच धावत असलेल्या आणि धावणाऱ्या मेट्रो प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा म्हणून प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षिततेवर, कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर भर देत आहे. प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून कर्मचाऱ्यांना प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
---------------------
मेट्रो-२ अ - दहिसर ते डी. एन. नगर
मेट्रो-७ - दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व