सार्वजनिक ठिकाणी असलेले कबुतरखाने बंद करायला हवेत - माजी महापौर शुभा राऊळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 01:32 AM2020-05-06T01:32:48+5:302020-05-06T01:33:11+5:30
कोरोनाचाही प्रभाव वाढू शकतो
मनोहर कुंभेजकर
मुंबई : फुप्फुसांच्या आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या अस्थमा रुग्णांना कबुतरांमुळे लवकर संसर्ग होण्याची शक्यता जास्त असून त्यांना कोरोना विषाणूची लागण लवकर होऊन त्यांच्यात मृत्यूचे प्रमाण जास्त असते. कबुतरांच्या पंख व विष्ठेमुळे फुप्फुसांना जंतुसंसर्ग होतो, न्यूमोनिया, अस्थमा, ब्रॉन्कायटिस बळावतो, तसेच अॅलर्जी, खोकला व श्वासोच्छवासाचा त्रास होतो.
त्यामुळे मुंबईत सार्वजनिक ठिकाणी असणारे व मानवी आरोग्यास धोका पोहोचविणारे आणि अस्वच्छता करणारे उघड्यावरील कबुतरखाने अशा प्रकारच्या रुग्णांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढीस लागण्यास कारणीभूत ठरत आहेत. आतापर्यंत कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांमध्ये अस्थमाच्या रुग्णांची संख्या जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे.
कबुतरांच्या पंख व विष्ठेमुळे फुप्फुसांना जंतुसंसर्ग होतो, न्यूमोनिया, अस्थमा, ब्रॉन्कायटिस बळावतो, तसेच अॅलर्जी, खोकला व श्वासोच्छवासाचाही त्रास होतो. त्यामुळे सदर कबुतरखाने बंद करणे गरजेचे असल्याचे मत मुंबईच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. सदर कबुतरखाने बंद करण्याच्या मोहिमेला नागरिकांनी पाठिंंबा दिला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. २००७ ते २००९ या काळात मुंबईचे महापौरपद त्यांनी भूषवून आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर असलेल्या कबुतरखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश आपण मुंबई महानगरपालिकेला द्यावेत, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांच्याकडे केल्याचे त्यांनी सांगितले.
आजही कोरोनाचा मुंबईकर सामना करत असताना दुसरीकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून काही कबुतरप्रेमी नागरिक रोज कबुतरांना धान्य खायला घालतात. परिणामी धान्य खाण्यासाठी कबुतरांचे थवेच्या थवे जमा होत असून परिणामी सार्वजनिक ठिकाणी नवीन अवैध कबुतरखाने निर्माण होतात. त्यामुळे याला आळा घालण्यासाठी पालिका प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, असे मत त्यांनी व्यक्त केले. गेल्या चार महिन्यांपूर्वी बोरीवली पश्चिम येथील अवैध कबुतरखान्यावर नागरिकांच्या तक्रारीवरून कारवाई केली होती याची आठवण त्यांनी करून दिली.
खालील बाबींचा विचार करता येईल
एका वर्षात एक कबुतर ११.३ किलो विष्ठा टाकते, तसेच विष्ठेच्या विषारी वायू व पावडरीने जंतुसंसर्ग होऊन रुग्णाचा लवकर मृत्यू होतो, लहान बालके व ज्येष्ठ नागरिक यांना जंतुसंसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अस्थमाजन्य रुग्णांमध्ये विषाणूजन्य न्यूमोनियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईतील अस्वच्छ कबुतरखान्यांवर पालिकेने कारवाई केली पाहिजे, अशी आपली ठाम भूमिका असल्याचे डॉ. शुभा राऊळ यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा यापूर्वी दिलेल्या निकालात अशा अवैध कबुतरखान्यांवर कारवाई करण्याचे निर्देश महानगरपालिकांना दिले होते.
मात्र यावर कारवाई झाली नसल्याचे अनेक हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे, याकडे डॉ. राऊळ यांनी लक्ष वेधले.