मुंबई : शहर आणि उपनगरात कबुतरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कबुतरांच्या वावरामुळे फुप्फुसांचे गंभीर आजार बळावत आहेत. काहीवेळा तर फुप्फुस कायमचे निकामी होण्याची वेळ काही रुग्णांवर आली असून, या अशा रुग्णांना ‘लंग्स फायब्रोसिस’सारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागले आहे, असे श्वसनविकार तज्ज्ञांनी सांगितले.
कबुतरे उडताना त्यांच्या पिसांमधून आणि वाळलेल्या विष्ठेमधून बाहेर पडलेले सूक्ष्म कण फुप्फुसात गेल्याने विविध प्रकारच्या श्वसनविकारांना सामोरे जावे लागत आहे. लंग्स फायब्रोसिस म्हणजे इडिओपेथिक. कारण माहीत नसणे, असा या शब्दाचा अर्थ होतो.
लंग्स फायब्रोसिस म्हणजे हा फुप्फुसाचा एक गंभीर आजार असून, तो श्वसनप्रणालीवर परिणाम करतो. हा आजार असलेल्या रुग्णास चालताना मोठ्या प्रमाणात दम लागतो. अशा रुग्णांना काही वेळेस कृत्रिमरीत्या ऑक्सिजन देण्याची वेळ येते. त्यामुळे याचा परिणाम दैनंदिन कामावर होत असतो, असे श्वसनविकार तज्ज्ञांनी सांगितले.
काय काळजी घ्याल? - कबुतरांपासून शक्यतो दूर राहावे. - त्यांना खायला देऊ नये. - कबुतरखान्याच्या परिसरात असाल तर मास्क किंवा रुमालाचा वापर करावा.- खिडक्यांमध्ये कबुतरे वास्तव्य करणार नाहीत, याची काळजी घ्यावी. - श्वसनविकाराचा त्रास असलेल्यांनी कबुतरांचा वावर असलेल्या ठिकाणी अधिक काळजी घेतली पाहिजे. - खूप काळ खोकला असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
विष्ठेतील बुरशी, जिवाणू ठरतात घातककबुतरांना अनेकदा खायला देऊ नये. कबुतरखाने बंद करावेत, अशी मागणी नागरिक करतात. कबुतरखान्याच्या परिसरातील नागरिकांना श्वसनविकाराचा आजार होतो. कबुतरांच्या विष्ठेत बुरशी, जिवाणू असतात. त्यामुळे त्यांच्या विष्ठेतून झालेल्या संसर्गामुळे श्वसनविकार वाढतो. रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना फुप्फुसाचा त्रास बळावतो. त्याचे रूपांतर लंग्स फायब्रोसिसमध्ये होण्याची शक्यता असते. श्वसनाचा काही विकार झाल्यास तत्काळ डॉक्टरांकडून वेळीच उपचार घ्यावेत. अन्यथा गुंतागुंत होऊ शकते.- डॉ. जलील पारकर, श्वसनविकार तज्ज्ञ, लीलावती रुग्णालय