मुंबई : धार्मिक मिरवणुका व इतर समारंभांमध्ये लेझर बीम, तसेच मोठ्या आवाजाच्या डीजे साउंड सिस्टीमच्या वापराविरोधात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. याचिकाकर्त्याला तक्रार करण्यासाठी इतर पर्याय उपलब्ध असल्याचे स्पष्ट करत मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला.
सणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या घातक लेझर बीममुळे अनेकांची दृष्टी गेली आहे. तसेच डीजे सिस्टीममुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे अनेकांची श्रवणशक्ती कमी झाली आहे. मोठ्या आवाजामुळे इमारतीमध्ये कंपनेदेखील निर्माण होतात, याकडे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने याचिकेत लक्ष वेधले होते.
याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या असल्या तरी लेझर बीममुळे उद्भवणाऱ्या समस्यांबाबत कोणतेही विशिष्ट नियम नाहीत. त्यामुळे राज्य सरकारला यासंदर्भात निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.