मुंबई : क्रिकेटच्या सामन्यांदरम्यान खेळाडूंना प्रोत्साहित करणे व त्यासाठी लोकांनी आरडाओरडा करणे स्वाभाविक आहे. समाजात थोडा गोंगाट असू द्या, असे म्हणत उच्च न्यायालयाने आयपीएलविरोधात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका फेटाळली.२०१३ मध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियम आणि पुण्यातील सुब्रतो रॉय सहारा स्टेडियममध्ये चाललेल्या आयपीएल सामन्यांदरम्यान ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याने व्यवसायाने वकील असलेले कपिल सोनी यांनी २०१४ मध्ये उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.ध्वनिप्रदूषणांच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए)वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती सोनी यांनी न्यायालयाला केली होती.याचिकेनुसार, २०१३ मध्ये मुंबई व पुण्यात झालेले आयपीएलचे सामने रात्री आठ ते मध्यरात्रीपर्यंत सुरू होते. बक्षीसवाटपाचा कार्यक्रम मध्यरात्रीपर्यंत सुरू होता.‘सामन्यादरम्यान खेळाडूंनी चौकार, षटकार लगावला किंवा बळी (विकेट) घेतला तर लोक जल्लोष करणे स्वाभाविक आहे. समाजाला थोडी मजा करू द्या, थोडा गोंगाट असू द्या,’ असे मुख्य न्या. प्रदीप नंद्राजोग यांनी म्हटले. तसेच याचिकाकर्ते दहिसरचे रहिवासी असल्याची दखलही न्यायालयाने घेतली. ‘स्टेडियमपासून एवढ्या दूर राहत असूनही याचिकाकर्त्यावर त्याचा (सामन्यादरम्यान होत असलेल्या गोंधळाचा) परिणाम कसा होतो? स्टेडियमच्या परिसरात राहणाऱ्या एकाही रहिवाशाने याबाबत तक्रार केली नाही,’ असे उच्च न्यायालयाने याचिका फेटाळताना म्हटले.
ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी आयपीएलविरोधात दाखल जनहित याचिका न्यायालयाने फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 5:42 AM