सीमा महांगडे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कचऱ्याचा उगम, प्रसार आणि त्याच्या विल्हेवाटीसाठी बेफिकीर असणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी आवश्यक असलेले मुंबई महानगरपालिकेतील उपद्रव शोधक हे पद भरण्याविषयीची उदासीनता आणि त्यामुळे रिक्त राहिलेली ९६ टक्के पदे या महानगरातील नागरिकांच्या जीवावर उठली आहेत. कारण यामुळे कचऱ्यांच्या तक्रारीत प्रचंड वाढ झाली असून सन २०२२ या एका वर्षात कचरा न उचलेल्या सुमारे चार हजार तक्रारी पालिकेकडे दाखल झाल्या आहेत.
आजमितीस पावणेदोन कोटींच्या घरात गेलेली लोकसंख्या आणि ४० हजार कोटींचा वार्षिक अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महानगरीचे व्यवस्थापन जणू काही गुदमरतेय, असे वाटण्याजोगी स्थिती कचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत निर्माण झाली आहे.
उपद्रव शोधकांची १०३ पदे मंजूर असतानाही त्यातील ९९ पदे रिक्त असल्याची आकडेवारी महानगरपालिकेकडून मिळाली आहे. कचऱ्याबाबत शास्त्रशुद्ध अभ्यास जणू बंद झाल्याने गेल्या १० वर्षांत नागरिकांकडून कचरा विल्हेवाटीच्या तक्रारींमध्ये १२४ टक्क्यांनी वाढ झाली असून याचा परिणाम वायू प्रदूषणावर होत असल्याचे अभ्यासाअंती स्पष्ट झाले होते. त्यामुळे वायुप्रदूषणाच्या तक्रारींमध्ये २३७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
कचरा उचलण्यासाठी पालिकेने स्थानिक वर्गीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला असूनही २०२२ या वर्षात तब्बल ४ हजाराहून अधिक कचरा न उचलण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये पालिकेच्या भाजी मंड्या, घरगल्ल्या, संकलन केंद्रावरील कचरा तसाच पडून असल्याच्या तक्रारींचा समावेश आहे. २०१३ पासून यामध्ये सातत्याने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पालिकेच्या कचरा उचलण्यासाठीच्या सुविधा नेमक्या कुठे कार्यरत आहेत, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.
२०१३ ते २०२२ या दरम्यान कचरा न उचलण्याच्या ३५ हजार तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. २०२२ या वर्षात कचरा न उचलण्याच्या तब्बल ४ हजाराहून अधिक म्हणजेच महिन्याला ३०० हून अधिक तक्रारी मुंबईकरांनी केल्या आहेत. कोरोनाकाळात या तक्रारींचे प्रमाण ३ ते साडेतीन हजाराच्या घरात होते तर त्याआधी २०१८ मध्ये कचरा न उचलण्याच्या ५ हजाराहून अधिक व २०१९ मध्ये ६ हजाराहून तक्रारी नोंदविल्या होत्या. रस्त्यांवरच राडारोडा न उचलण्याच्या आणि उपद्रव या पदावर मनुष्यबळच नसल्याच्या तक्रारी नोंदविल्या आहेत.
हेल्पलाइनमुळे दिलासा ?
दरम्यान कचऱ्याच्या समस्या सोडविण्यासाठी यंदापासून पालिकेने हेल्पलाइन सुरू केली असून यामुळे मुंबईकरांनी केलेल्या तक्रारीनंतर कचरा उचलला जात असल्याचा दावा घनकचरा व्यवस्थापनाकडून केला जात आहे. जानेवारी ते जुलै दरम्यान मुंबईकरांच्या ५ हजार तक्रारींचा निपटारा केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यासंदर्भात पालिका घन कचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त चंदा जाधव यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
नवीन ३२ वाहने
पालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी अधिकाऱ्यांना कचरा संकलनाच्या फेऱ्या वाढविण्यासाठी सूचना दिल्या असून कचरा उचलण्याच्या रोजच्या कामकाजात अधिक सुसूत्रता आणण्यासाठी नव्याने कोट्यवधी रुपयांची ३२ कॉम्पॅक्टर वाहने ताफ्यात दाखल झाली आहेत, असे सांगण्यात आले. एकूण ३२ कॉम्पॅक्टर वाहनांपैकी शहरासाठी ६, पश्चिम उपनगरे ११ आणि पूर्व उपनगरासाठी १५ वाहने उपलब्ध झाली आहेत. हातात तरी मुंबईत ठिकठिकाणी वाढणाऱ्या कचऱ्याचं ढिगावर नियंत्रण येणार का असा प्रश्न कचऱ्याच्या समस्येबाबत काम करणाऱ्या न्यू संगम वेल्फेअर सोसायटी या स्वयंसेवी संस्थेकडून विचारण्यात आला आहे.
कचरा समस्या २०१८ २०१९ २०२० २०२१ २०२२
एकूण कचरा संकलन केंद्राकडे दुर्लक्ष ०६२० ०६८५ ०३३६ ५४८ ५४५२कचरागाड्याची सेवा न मिळणे ०७५१ ०३२६ ०२८९ ०४४४ ४२२७कचरा उचलला न जाणे ६०८६ ३९४३ ३३१९ ४३५६ ३५०६४झाडांच्या फांद्याचा कचरा १७५३ १५९० २०२९ १०७१ १०७२७उपद्रव शोधक उपलब्ध नसणे १९४७ ११६८ १२१८ ११३९ १०२५९कचरा डबा उपलब्ध नसणे ०६६६ ०४४० ०४३७ ०६९६ ४९३०मृत जनावरे न उचलणे ११०५ ११६४ ९०९ ७०३ ४७८५राडारोडा न उचलणे २३७१ १३९५ १५५० १८९९ १५०७३रस्त्यावरील गाळ न उचलणे ०८४५ ०३२० ०३८६ ०५८७ ५६३५रस्त्यांची सफाई ०९७२ ०५६४ ०५८३ ०९०८ ५९९४