वांद्रे-वर्सोवा सीलिंक मार्गिकेच्या १४ पाईलचे काम झाले पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 12:54 AM2020-01-07T00:54:34+5:302020-01-07T00:54:42+5:30
वांद्रे-वर्सोवा हे सागरी मार्गाने जोडण्यासाठी वांद्रे- वर्सोवा सी-लिंक प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतले आहे.
मुंबई : वांद्रे-वर्सोवा हे सागरी मार्गाने जोडण्यासाठी वांद्रे- वर्सोवा सी-लिंक प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतले आहे. या मार्गिकेच्या कामाला आता सुरुवात झाली असून आतापर्यंत १४ पाईल्सचे काम पूर्ण झाले आहे. सीलिंकच्या संपूर्ण मार्गिकेवर एकूण पाच हजार पाईल्स उभारण्यात येणार आहे. या पाईल्सच्या सहाय्याने सागरी भागामध्ये एक हजार पिलर (स्तंभ) उभारण्यात येणार आहे. या पिलरच्या आधारे सीलिंक मार्गिका बांधण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे (एमएसआरडीसी) वांद्रे-वर्सोवा दरम्यान समुद्रीमार्गे सतरा किलोमीटर लांबीचा सीलिंक तयार करण्यात येत आहे. या मार्गिकेसाठी ११ हजार ३३२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. या मार्गिकेवर आठ लेन असतील. नोव्हेंबर महिन्यापासून सुरू झालेल्या सीलिंकचे काम मंद गतीने सुरू आहे. एमएसआरडीसीनुसार या मार्गिकेच्या कामामध्ये दरदिवशी सहा पाईल्स आणि एका महिन्यात कमीतकमी १४० पाईल्सचे काम झाले पाहिजे. काम असेच धिम्या गतीने काम सुरू राहिले तर प्रकल्प वेळेमध्ये पूर्ण होणे कठीण होऊ शकते. एमएसआरडीसीने २०२३ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. या मार्गिकेच्या बांधकामाचे काम रिलायंस इंंफ्रास्ट्रक्चर कंपनीला देण्यात आले आहे.
ही कंपनी इटलीच्या कंपनीसोबत मिळून सीलिंक मार्गिका बांधणार आहे. या मार्गिकेमुळे पन्नास मिनिटांचा प्रवास अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये होणार आहे. यामुळे पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी काही प्रमाणामध्ये सुटण्यास मदत होणार आहे.
>कारशेडअभावी रखडले होते काम
जुहू समुद्रकिनाऱ्यावर बांधल्या जाणाºया कारशेडमुळे पर्यावरणाची मोठी हानी होणार असल्याचे नमूद करत पर्यावरणवाद्यांनी उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली होती. यावर कारशेडच्या बांधकामावर अंतरिम स्थगिती देण्यात आली होती. यामुळे एमएसआरडीसीने न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत, नव्या जागेचा शोध सुरू केला होता.
दरम्यान, या प्रकल्पाचा खर्च वाढत असल्याने नवीन जागेसाठी एमएसआरडीसीने निविदा काढल्या होत्या. मात्र दोन वेळा निविदा काढूनही याला प्रतिसाद मिळाला नाही. अखेर मालाड परिसरातील एका जमीन मालकाने कास्टिंग यार्डसाठी जमीन देण्याची तयारी दर्शविली. यामुळे आता मार्गिकेच्या कामाला सुरुवात झाली आहे.
>पाईल म्हणजे काय ?
मार्गिकेसाठी पुलाचा खांब उभारण्यापूर्वी जमिनीमध्ये खोदकाम करून खांब्याच्या उभारणीसाठी जो आधारस्तंभ तयार करण्यात येतो त्याला ‘पाईल’ असे म्हणतात. एमएसआरडीएनुसार प्रकल्पाच्या ठिकाणी परिस्थितीनुसार एक पिलरच्या उभरणीसाठी काही ठिकाणी सहा पाईल्स तर काही ठिकाणी आठ पाईल्सचा वापर करण्यात येतो. एका पाईलच्या निर्मितीसाठी २० ते २५ लाखांचा खर्च येतो.