यात्रेनिमित्त डबेवाले सुटीवर
By admin | Published: April 9, 2017 03:27 AM2017-04-09T03:27:30+5:302017-04-09T03:27:30+5:30
चाकरमान्यांना कार्यालयात गरमागरम जेवण वेळेत देणारे डबेवाले १० ते १५ एप्रिलदरम्यान गावी जत्रेसाठी जाणार आहेत. यामुळे या काळात सुमारे अडीच लाख नोकरदारांना
मुंबई : चाकरमान्यांना कार्यालयात गरमागरम जेवण वेळेत देणारे डबेवाले १० ते १५ एप्रिलदरम्यान गावी जत्रेसाठी जाणार आहेत. यामुळे या काळात सुमारे अडीच लाख नोकरदारांना सकाळी घरूनच डबे घेऊन कार्यालयात जावे लागणार आहे. १६ एप्रिल रोजी रविवार असल्याने थेट १७ एप्रिलपासून डबेवाल्यांची सेवा पूर्ववत सुरू होईल.
पुणे जिल्ह्यातील मुळशी, मावळ राजगुरू नगर, आंबेगाव आणि जुन्नर या तालुक्यांतील, तर अहमदनगर जिल्ह्यातील अकोला आणि संगमनेर तालुक्यातील कुलदैवतांच्या जत्रा असल्याने सर्व डबेवाले गावी जाणार आहेत. या काळात डबे पोहोचवले जाणार नाहीत. या काळात महावीर जयंती, गुड फ्रायडे आणि रविवार अशा सार्वजनिक सुट्या असून, तीन दिवस डबेवाले रजा घेणार आहेत. अनेक वर्षांपासून डबेवाले अवितरणपणे आपली सेवा करत आहेत. गावच्या यात्रेसाठी डबेवाले नित्याने जातात, त्यामुळे डबेवाल्यांच्या सेवेत काही काळ खंड असेल. या काळातील पगार कापू नये, असे आवाहन मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी जेवणाचा डबा घेणाऱ्यांना केले आहे. (प्रतिनिधी)