इमारतीच्या पिलरला तडे
By admin | Published: June 25, 2015 11:06 PM2015-06-25T23:06:59+5:302015-06-25T23:06:59+5:30
कामोठेतील एका इमारतीच्या खांबाला तडे गेल्याने रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. पाच वर्षांपूर्वी उभारलेल्या इमारतीची अशी दुर्दशा
कळंबोली : कामोठेतील एका इमारतीच्या खांबाला तडे गेल्याने रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. पाच वर्षांपूर्वी उभारलेल्या इमारतीची अशी दुर्दशा झाल्याने बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी रहिवाशांकडून होत आहे.
येथील सेक्टर-२१ येथे भूखंड क्रमांक १७३ आणि १७४ वर साई गृह बिल्डरने चार मजल्यांची इमारत २0१0 साली बांधली. बिल्डर जगदीश पटेल यांनी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा रहिवाशांचा आरोप आहे.
गुरुवारी सकाळी इमारतीच्या गेटसमोरील पिलरला तडे जावून प्लास्टर निखळले. काही गजांवर तो पिलर उभा असल्याने सोसायटीचे अध्यक्ष दीपक काकडे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी रहिवासी तसेच गाळेधारकांना इमारतीबाहेर निघण्यास सांगितले. पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे यांनीही घटनास्थळी भेट देऊन रहिवाशांची दुसऱ्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार बाजूलाच असलेल्या तिरुपती अपार्टमेंटमध्ये या कुटुंबांची राहण्याची तात्पुरती सोय करण्यात आली आहे. आम्ही पै पै करून पैसा जमा केला त्याचबरोबर कर्ज काढून बिल्डरला पैसे दिले. आजही सगळेजण हप्ते भरताहेत असे असताना आम्हाला रस्त्यावर यावे लागले, अशी प्रतिक्रिया येथील रहिवासी बाळासाहेब जाधव यांनी दिली. (वार्ताहर)