कॅप्टन दीपक साठे अनंतात विलीन शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 04:26 AM2020-08-12T04:26:24+5:302020-08-12T04:26:34+5:30
मुंबई : ‘कॅप्टन दीपक साठे अमर रहे’च्या घोषणा, तिन्ही संरक्षण दलांसह मुंबई पोलिसांकडून वाहिलेली श्रद्धांजली, साश्रू नयनांनी निरोप देणारे ...
मुंबई : ‘कॅप्टन दीपक साठे अमर रहे’च्या घोषणा, तिन्ही संरक्षण दलांसह मुंबई पोलिसांकडून वाहिलेली श्रद्धांजली, साश्रू नयनांनी निरोप देणारे कुटुंबीय, आप्तेष्ट आणि खिडकीतून, बाल्कनीतून सॅल्यूट करणारे नागरिक... अशा दु:खद वातावरणात निवृत्त विंग कमांडर आणि एअर इंडियाचे वैमानिक कॅप्टन दीपक साठे मंगळवारी अनंतात विलीन झाले.
केरळमधील कोझिकोड येथे एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या साठे यांच्या पार्थिवावर विक्रोळी स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थिव अंत्यदर्शनासाठी चांदिवली येथील निवासस्थानी आणले. येथे कुटुंबीयांसह मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. साठे यांचे वडील आणि निवृत्त सैन्य अधिकारी वसंत साठे (८७), आई नीला (८३) अमेरिकेतील मोठा मुलगा शंतनु, लहान मुलगा धनंजय, पत्नी सुषमा हेदेखील उपस्थित होते. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खा. पूनम महाजन आदींनी आदरांजली वाहिली.