नवी मुंबई : विमानतळ प्रभावित अर्थात नैना क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने सिडकोने कार्यवाही सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात पनवेल तालुक्यातील २३ गावांचा प्रायोगिक तत्त्वावर विकास करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यानुसार पथदर्शी प्रकल्प (पायलट प्रोजेक्ट) तयार करण्यात आला आहे. त्यावर जनतेकडून प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर १८ जून रोजी अंतिम सुनावणी होणार आहे. सिडकोने या क्षेत्राच्या विकासासाठी कंबर कसली आहे. मात्र जनतेच्या विनंतीनुसार हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत १० आॅक्टोबर २०१४ पर्यंत वाढविण्यात आली होती. या अंतिम मुदतीपर्यंत सिडकोला ३९४६ हरकती व सूचना प्राप्त झाल्या होत्या. प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर तीन टप्प्यांत सुनावणी घेण्यात आली होती. मात्र त्यापैकी ६६७ अर्जांची सुनावणी घेणे राहून गेले होते. आता या उर्वरित अर्जांची १८ जून रोजी सुनावणी घेण्याचा निर्णय नियोजन समितीने घेतला आहे. बेलापूर रेल्वे स्थानक संकुलातील सिडकोच्या नैना कार्यालयात ही सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी बोलाविण्यात आलेल्या ६६७ जणांची यादी सिडकोच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
नैना क्षेत्रात विकासाचा पायलट प्रोजेक्ट
By admin | Published: June 14, 2015 12:33 AM