कच-याच्या व्यवस्थापनासाठी पायलट प्रोजेक्ट

By admin | Published: November 23, 2014 11:03 PM2014-11-23T23:03:50+5:302014-11-23T23:03:50+5:30

रायगड जिल्ह्यात रोज निर्माण होणाऱ्या कच-याच्या व्यवस्थापनासाठी सामाजिक संस्था, संघटना, विविध कंपन्या यांना सामावून घेण्यात येणार आहे

Pilot Project for the management of the waste | कच-याच्या व्यवस्थापनासाठी पायलट प्रोजेक्ट

कच-याच्या व्यवस्थापनासाठी पायलट प्रोजेक्ट

Next

आविष्कार देसाई, अलिबाग
रायगड जिल्ह्यात रोज निर्माण होणाऱ्या कच-याच्या व्यवस्थापनासाठी सामाजिक संस्था, संघटना, विविध कंपन्या यांना सामावून घेण्यात येणार आहे. त्यांच्यामार्फतच कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प राबवून त्या माध्यमातून वीजनिर्मितीसह खतांची निर्मिती करण्यात येणार आहे. हा प्रकल्प प्रथम जिल्ह्यातील सहा गावात प्रायोगिक तत्त्वावर राबविला जाणार आहे.
रायगड जिल्हा हा विकसित जिल्हा म्हणून उदयास येत आहे. येथे मोठ्या संख्येने उद्योग-धंदे सुरु आहेत. विकासकामेही मोठ्या प्रमाणात होत आहेत. काही ठरावीक रोजगाराची निर्मिती होत असल्याने येथे दिवसेंदिवस शहरीकरणात वाढ होत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. कचऱ्यामुळे साथीचे रोग पसरतात. त्यामुळे आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
मोठ्या संख्येने निर्माण होणारा कचरा टाकण्यासाठी जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींकडे डंपिंग ग्राऊंड नाहीत, तसेच त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची यंत्रणाच नसल्याने आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. काहीच दिवसांपूर्वी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम हाती घेऊन लाखो टन कचरा काढला होता. कचरा उचलल्यानंतर पुन्हा त्याची तेवढ्याच वेगाने निर्मिती होत असल्याने या कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या वेगाने बळावत आहे, मात्र वेगाने जमा होणाऱ्या या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी याबाबत योग्य ती यंत्रणाच नसल्याने त्या त्या नगर पालिका आणि ग्रामपंचायतीपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न नुकत्याच झालेल्या जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला होता.
कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी विविध सामाजिक संस्था, संघटना, विविध कंपन्यांची मदत घेण्यात येणार आहे. त्यांच्याच माध्यमातून कचऱ्याचे व्यवस्थापन करुन त्यातून खतनिर्मिती करण्यावर भर देण्यात येणार आहे, असे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
या पायलट प्रोजेक्टमध्ये कोणती गावे सहभागी करायची त्याचा निर्णय झालेला नाही.
जिल्हा परिषदेकडे असणाऱ्या निधीतून हा प्रकल्प राबविला जाणार आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी लोकमतला सांगितले.
दरम्यान, अनंत गीते हे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री आहेत. त्यांनीच यामध्ये पुढाकार घेतल्याने विविध कंपन्यांना यामध्ये आपले योगदान देणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे हा पायलट प्रोजेक्ट निश्चितच यशस्वी होईल व त्यातून गंभीर अशा स्वरुपाची कचरा विल्हेवाटीची समस्या सुटेल, असे बोलले जात आहे.

Web Title: Pilot Project for the management of the waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.