मनोज गडनीस, लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एअर इंडियाच्या विमानाने सोमवारी संध्याकाळी मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांना कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा मोठा फटका बसला. एअर इंडिया कंपनीचे एआय-६२९ हे विमान मुंबईतून सायंकाळी सात वाजून २० मिनिटांनी नागपूरसाठी उड्डाण करणे अपेक्षित होते; मात्र वैमानिक आणि केबिन कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे विमानाने साडेतीन तासांच्या विलंबाने रात्री साडेदहाच्या दरम्यान उड्डाण केले. नियोजितवेळी बोर्डिंग सुरू न झाल्यामुळे व त्यानंतरही काही काळ गेल्यानंतर प्रवाशांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना विमानाच्या विलंबाबद्दल जाब विचारण्यास सुरुवात केली. त्यावेळी गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर विमानाच्या उड्डाणासाठी वैमानिक व केबिन कर्मचारी नसल्याचे कारण प्रवाशांना सांगण्यात आले. या विमानाने केवळ मुंबईतूनच प्रवासी नागपूरला जात नव्हते तर सौदी अरेबिया आणि अन्य देशांतून मुंबईत येत या विमानाने नागपूरला जाण्यासाठीही प्रवाशांनी या विमानाचे बुकिंग केले होते. परदेशातून प्रवास करून आलेल्या प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. अनेक प्रवासी कंटाळून विमानतळावर जमिनीवर बसून होते. मुंबईहून सायंकाळी सात वाजून २० मिनिटांनी उडणारे हे विमान नागपूरला रात्री ८ वाजून ५५ मिनिटांनी पोहोचणे अपेक्षित होते.
वैमानिक आले नाहीत, विमान लटकले साडेतीन तास
By मनोज गडनीस | Published: April 16, 2024 7:22 AM