Join us

वैमानिकांचा ‘अकासा’विरुद्ध एल्गार; काही मुद्यांविरोधात थेट नागरी हवाई मंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 08:19 IST

व्यवस्थापनात गैरव्यवहार होत असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मागील दोन वर्षांपासून विमान व्यवसाय सुरू केलेल्या अकासा एअर कंपनीच्या विरोधात कंपनीतील एका वैमानिक गटाने ‘एल्गार’ पुकारला आहे. व्यवस्थापनात गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करणारे एक पत्र ई-मेलद्वारे नागरी हवाई मंत्र्यांना पाठविले आहे.

कंपनीमध्ये नोकरी देताना नियमांचे पालन होत नाही, व्यवस्थापन आपल्या मर्जीने वागत आहे. तसेच काही कर्मचारी वेळेवर कामावर येत नाही. वैमानिकांच्या वेळापत्रकातही त्रुटी आहेत, असा आरोप या वैमानिकांनी पत्राद्वारे करीत कंपनीचे लेखा परीक्षण करण्याची मागणी  केली आहे. या संदर्भात कंपनीने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. 

डीजीसीएकडे तक्रार

काहीच दिवसांपूर्वी कंपनीच्या प्रशिक्षणात दोष असल्याचा मुद्दा उपस्थित करीत कंपनीच्या काही वैमानिकांनी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे (डीजीसीए) कंपनी विरोधात तक्रार केली होती. कंपनीने हे आरोप फेटाळले होते. परंतु, गेल्यावर्षी डीजीसीएने कंपनीचे अचानक लेखा परीक्षण केले होते. त्यावेळी कंपनीच्या कामकाजात त्रुटी आढळून आल्यानंतर कंपनीवर आर्थिक दंडाची कारवाई केली होती. 

मुंबई विमानतळाची ग्राहक सेवा सर्वोत्तम

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला एअरपोर्ट काैन्सिल इंटरनॅशनलने जागतिक प्रतिष्ठेचे लेव्हल-५ हे प्रमाणपत्र जारी केले आहे. सर्वोत्तम ग्राहक सेवा बहाल करत हे प्रमाणपत्र देण्यात आले. हे प्रमाणपत्र प्राप्त करणारे मुंबई विमानतळ हे देशातील पहिले, तर जगातील तिसऱ्या क्रमांकाचे विमानतळ ठरले आहे. मुंबई विमानतळावर गेल्या काही वर्षांपासून प्रवाशांच्या संख्येचे विक्रम रचले जात आहेत. 

टॅग्स :वैमानिकआंदोलनज्योतिरादित्य शिंदे