शस्त्रक्रियेविना काढली छातीत अडकलेली पिन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 02:51 AM2018-12-03T02:51:21+5:302018-12-03T02:51:27+5:30

चेंबूर येथील १८ वर्षीय तरुणीच्या फुप्फुसात तब्बल सहा दिवस अडकून असलेली ३.५ सेंटीमीटरची पिन शस्त्रक्रियेविना काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

Pin attached to the chest removed without surgery | शस्त्रक्रियेविना काढली छातीत अडकलेली पिन

शस्त्रक्रियेविना काढली छातीत अडकलेली पिन

Next

मुंबई : चेंबूर येथील १८ वर्षीय तरुणीच्या फुप्फुसात तब्बल सहा दिवस अडकून असलेली ३.५ सेंटीमीटरची पिन शस्त्रक्रियेविना काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. चेंबूर येथील खासगी रुग्णालयात २७ नोव्हेंबर रोजी तिला दाखल करण्यात आले. त्यानंतर, डॉक्टरांनी ब्राँन्कोस्कोपीच्या साहाय्याने ही तीन सेंटीमीटरची पिन बाहेर काढली आहे. आता रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
नाझमी (नाव बदलले आहे) २१ नोव्हेंबर रोजी गोव्यामध्ये होती. स्कार्फ परिधान करत असताना अनवधानाने तोंडात धरलेली पिन तिने चुकून गिळली. तिला लगेचच गोव्यातील वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. पिन नक्की कुठे अडकली आहे, ते शोधण्यासाठी तिच्या छातीचा एक्स-रे काढला. त्यांनी एण्डोस्कोपीने पिन काढण्याचा प्रयत्नही केला, पण तो अयशस्वी ठरला.
त्यानंतर, फुप्फुसात अडकलेली पिन एण्डोस्कोपी करून काढण्यात तीन वैद्यकीय महाविद्यालये आणि
दोन रुग्णालयांना अपयश हाती लागले होते. त्या वेळी कुटुंबाने
तिला मुंबईत हलविण्याचा निर्णय घेतला. त्या वेळेस चेंबूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात
आले. या ब्राँकोस्कोपीविषयी फुप्फुसविकारतज्ज्ञ डॉ. अरविंद काटे यांनी सांगितले की, रुग्ण दाखल झाली, तेव्हा तिच्याकडे एक्स-रे अहवाल होता. फुप्फुसात अडकलेली पिन धारदार आणि अणकुचीदार होती आणि ती काढली नसती, तर हृदय व फुप्फुसातील महत्त्वाच्या रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचले असते. त्याचप्रमाणे, सहा दिवसांपासून ती पिन तिच्या शरीरात असल्याने संसर्ग होण्याचा धोका होता. ओपन सर्जरी किंवा छेद देऊन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय अत्यंत गुंतागुंतीचा होता. कारण एण्डोस्कोपी करून पिन काढताना आतील अवयव फाटण्याचा धोका होता. त्यामुळे ब्रॉन्कोस्कोपी करून धारदार पिन बाहेर काढणे कठीण होते. या प्रकरणात फोरसेप्सचा वापर करून लवचिक ब्रॉन्कोस्कोपने ती बाहेर काढली.
>प्रकृती सुधारतेय
तरुणीचा भाऊ अल्ताफ शेख याने सांगितले की, नाझमीची प्रकृती आता स्थिर आहे. सहा दिवस तिला खूप त्रास झाला. मात्र, तरीही शस्त्रक्रियेविना तिचा जीव वाचविण्याचे आव्हान डॉक्टरांनी स्वीकारले. त्यामुळे आता तिची प्रकृती वेगाने सुधारत आहे.

Web Title: Pin attached to the chest removed without surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.