गुलाबी चक्रीवादळामुळे मुंबईत ‘अंधार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:07 AM2021-09-27T04:07:18+5:302021-09-27T04:07:18+5:30
मुंबई : बंगालच्या उपसागरात उठलेले गुलाब नावाचे चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशला धडकले असतानाच दुसरीकडे याचा प्रभाव म्हणून मुंबईतदेखील ...
मुंबई : बंगालच्या उपसागरात उठलेले गुलाब नावाचे चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशला धडकले असतानाच दुसरीकडे याचा प्रभाव म्हणून मुंबईतदेखील रविवारी दिवसभर मळभ दाटून आले होते. सकाळी आणि दुपारी येथे पावसाचा पत्ता नसला तरीदेखील सायंकाळी दादर, माहीमसह लगतच्या परिसरात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली होती.
रविवारी सकाळपासून मुंबईवर ढग दाटून आले होते. संपूर्ण मुंबईत ढग दाटून आल्याने काळोख पसरला होता. दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर असे सर्वत्र पावसाचे ढग असले तरी पावसाचा पत्ता नव्हता. दुपारी ४ वाजता मध्य मुंबई आणि पूर्व उपनगरात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. प्रथमत: सरींचे प्रमाण कमी होते. मात्र त्यानंतर ४ वाजता पावसाने बऱ्यापैकी जोर पकडला. ऐनवेळी दाखल झालेल्या पावसाने ऐन रविवारी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांची तारांबळ उडाली होती. विशेषत: सायंकाळीदेखील मुंबईवर ढग दाटून आल्याने अंधार होता. तर दुसरीकडे पावसाच्या किंचित सरी कोसळत होत्या.