वसई : नव्याने रूजू झालेल्या बंदर अधिकाऱ्याने दोन दिवसापूर्वी अर्नाळा येथे प्रस्तावित बंदराच्या जागेची पाहणी करण्याकरीता भेट दिली. मात्र, त्यांना स्थानिक मच्छीमारांचा रोष पत्करून त्यांना पोलीस संरक्षणात गावाबाहेर जावे लागले. बंदराच्या कामासाठी अधिकारी व ठेकेदार घटनास्थळी आल्याचे कळल्यानंतर संपूर्ण गाव त्या ठिकाणी लोटले होते.तीन वर्षापासून अर्नाळा येथील प्रस्तावित बंदराचे काम रखडलेलेच आहे. नव्याने रुजू झालेल्या पत्तन अभियंत्याने रविवारी ठेकेदारासह प्रस्तावित बंदराच्या जागेची पाहणी करण्यासाठी अर्नाळा गावाला भेट दिली. ही पाहणी सुरू असताना स्थानिक मच्छीमारांना त्याची कुणकुण लागताच गावातील सर्व मच्छीमार घटनास्थळी जमा झाले व त्यानंतर नजीकच असलेल्या मच्छीमार सोसायटीमध्ये त्यांना आणण्यात आले. या ठिकाणी प्रचंड वादविवाद झाला. मच्छीमार स्वराज्य समितीचे अध्यक्ष राजू तांडेल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रस्तावित अर्नाळा बंदराबाबत गेल्या दोन वर्षात घडलेल्या घटनांची माहिती दिली व या बंदराला गावातून प्रचंड विरोध असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर बंदर अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांना पोलीस संरक्षणातून अर्नाळा गावाबाहेर नेण्यात आले. प्रस्तावित बंदराच्या कामाच्या हालचाली सुरू झाल्यामुळे अर्नाळा गावातील वातावरण परत तापले आहे. या बंदराला स्थानिक मच्छीमार समाजाचा कडाडून विरोध आहे. दोन वर्षापूर्वी बंदराचे काम सुरू करण्याचे प्रयत्न झाले असता स्थानिक मच्छीमारांनी तो हाणुन पाडला. केंद्र सरकारच्या या निर्णयाला ग्रामसभेनेही प्रचंड मतांनी विरोध दर्शवला. त्यानंतर शासनाने हे काम स्थगित केले. (प्रतिनिधी)
बंदर जमिनीच्या पाहणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पिटाळले
By admin | Published: February 09, 2015 10:48 PM