गौरी टेंबकर - कलगुटकर , मुंबईदहिसरमध्ये दोन इसमांनी पिस्तुलाच्या धाकावर माझ्या पतीसह माझे अपहरण केल्याचे बोरीवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या महिला पोलिसाचे म्हणणे आहे. तथापि, या महिला पोलिसाच्या जबाबात काहीही तथ्य नसून, ती निव्वळ पोलिसांची दिशाभूल करत असल्याचा संशय दहिसर पोलिसांना आहे. आता पुढील चौकशीसाठी या महिलेला बोरीवली रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.सुनिता कोंडवलकर (३०) या रेल्वे पोलिसासह तिचा पती किरण (३५) या दोघांचे दहिसरमधील त्यांच्या घराजवळून अपहरण करण्यात आल्याची तक्रार दहिसर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या दोघांना पुण्यामधून पोलिसांनी सुनिताच्या नातेवाईकांच्या घरातून ताब्यात घेत, दहिसर पोलीस ठाण्यात आणले. ‘आम्हाला कस्तुरबा बसस्थानक परिसरात दोन अनोळखी इसमांनी पिस्तुलाचा धाक दाखवून बसने रेल्वे स्थानकाजवळ आणले. त्यानंतर एका ठिकाणी थांबलेल्या पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पियोमध्ये बसविले. या गाडीच्या खिडक्या काळ्या कापडाने झाकलेल्या होत्या व त्यावर पोलीस असे लिहिलेले होते. त्यातील एकाने ‘प्रवीणभाई ने जिधर बोला हैं उधर ले चलो’ असे म्हटले. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी या दोघांना एका ठिकाणी उतरविले. तेव्हा आम्ही दोघांनी पळ काढत खासगी ट्रॅक्सने पुण्यातील शिवाजीनगर गाठले आणि तिथून भावाच्या घरी गेलो,’ असे जबाबात म्हटले आहे.‘ त्यांचे ज्या ठिकाणाहून अपहरण झाले, त्या बोरीवलीसारख्या वर्दळीच्या रस्त्यावर त्यांना कोणीच पहिले नाही, तसेच पुण्याला जाण्याआधी या दोघांना अपहरणकर्त्यांनी नेमके कुठे उतरवले, तेदेखील त्यांना आठवत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे,’त्यामुळे हे दोघे अपहरणाचा बनाव करत असल्याचा आमचा संशय आहे, अशी माहिती दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश जाधव यांनी सांगितले. या महिलेने यापूर्वी अनेकांच्या विरोधात खोट्या तक्रारी केल्या असल्याचेही पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे, ज्यात दहिसरसह, कुर्ला पोलीस ठाण्याचाही समावेश आहे, असेही त्यांनी नमूद केले.
पिस्तुलाच्या धाकाने झाले अपहरण
By admin | Published: January 11, 2016 2:26 AM