दाभोलकर हत्येसाठी वापरलेले पिस्तुल सापडले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 06:16 AM2020-03-06T06:16:50+5:302020-03-06T06:17:14+5:30
हत्येनंतर तब्बल सात वर्षांनी ठाण्यातील खारेगाव खाडीजवळच्या समुद्रकिनाऱ्यावर पिस्तुल सापडले असून, त्यातूनच त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मुंबई : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासप्रकरणी केंद्रीय गुन्हा अन्वेषण शाखेला (सीबीआय) मोठा पुरावा हाती लागला आहे. हत्येनंतर तब्बल सात वर्षांनी ठाण्यातील खारेगाव खाडीजवळच्या समुद्रकिनाऱ्यावर पिस्तुल सापडले असून, त्यातूनच त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्याची शक्यता वर्तविली जात आहे. दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेले हे पिस्तुल नॉर्वेतील पाणबुड्याने शोधून काढले असून, त्यांची खातरजमा करण्यासाठी न्यायवैधक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.
फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानंतर दाभोलकर यांच्यावर झाडण्यात आलेल्या गोळ्या खारेगाव खाडीजवळ सापडलेल्या याच पिस्तुलमधून झाडण्यात आल्या होत्या का, हे स्पष्ट होणार असल्याचे याबाबत अधिक माहिती देताना सीबीआयच्या सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.
पिस्तुलाच्या शोधासाठी नावाजलेल्या पाणबुड्यांना पाचारण
दाभोलकर हत्याप्रकरणात महत्त्वाचा पुरावा समजल्या जाणाºया या पिस्तुलाच्या शोधासाठी जगभरातील नावाजलेल्या मरीन कंपन्या आणि पाणबुड्यांना पाचारण करण्यात आले होते. दुबईतील एनव्हिटेक मरीन कंपनीने त्यासाठी नॉर्वेतील पाणबुडे व तेथील सामग्री मागविली होती. अखेर या पिस्तुलाचा शोध लागल्याचे सांगण्यात आले आहे.
पुण्यात ओंकारेश्वर येथे मॉर्निंग वॉकसाठी जात असताना २० आॅगस्ट २०१३ मध्ये हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांच्यावर निर्घृणपणे गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. मोटारसायकलीवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी हे कृत्य केले होते. याप्रकरणी सीबीआय आणि एटीएसकडून विशेष तपास पथक (एसआयटी) गठीत करून तपास करण्यात येत आहे.
दाभोलकर यांची हत्या केल्यानंतर ते पिस्तुल मारेकऱ्यांनी खाडीत फेकल्याची कबुली दिली होती. त्यानुसार खाडी पिंजून काढत या पिस्तुलाचा शोध तपास पथकाकडून घेण्यात येत होता.
>पिस्तुल शोधण्यासाठी साडेसात कोटी खर्च
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपास केंद्रीय गुन्हा अन्वेषण शाखेकडून करण्यात येत आहे.
तपासादरम्यान खारेगाव येथील खाडीत पिस्तुलाचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले.पिस्तुलाच्या शोधासाठी तपास पथकाने आतापर्यंत साडेसात कोटी रुपये खर्च केले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. अद्ययावत यंत्रसाम्रगी, साधने, चुंबकीय स्लेजचा वापर करून समुद्रकिनाºयाचा गाळ उपसण्यात येत होता. महागड्या सामग्रीमुळे खर्चात मोठी वाढ झाल्याचे अधिकाºयांनी सांगितले. राज्य सरकार, पर्यावरण विभागाची परवानगी मिळविण्यात आली. नॉर्वेहून मशीनरी आणण्यासाठी सुमारे ९५ लाख डॉलर्स शुल्क भरावे लागले होते.