खड्डा दिसला की लगेच करा मोबाइलवरून मेसेज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 11:24 PM2018-08-18T23:24:31+5:302018-08-19T05:56:17+5:30
तक्रारींच्या निवारणासाठी आता प्रत्येक महापालिकेत केंद्र
- विशेष प्रतिनिधी
मुंबई : खड्डे आणि रस्त्यांच्या एकूणच दुरावस्थेबाबत तक्रारी स्वीकारण्यासाठी व निवारणासाठी मुंबईसह राज्यातील सर्व २७ महापालिकांमध्ये तक्रार निवारण केंद्र तातडीने सुरू करण्याचे आदेश नगरविकास विभागाने शनिवारी दिले.
या निवारण केंद्रांवर इ मेलद्वारे आणि मोबाइलवरून मेसेजद्वारेही तक्रार करण्याची सोय असेल. खड्डा एकदा का दुरुस्त झाला की आधीचे आणि दुरुस्तीनंतरचे छायाचित्र महापालिकेने तयार केलेल्या संकेतस्थळावर टाकणे अनिवार्य करण्यात आले आहे. तक्रार आल्यानंतर जास्तीत जास्त तीन आठवड्यांच्या आत तिचे निराकरण करावे लागणार आहे.
रस्त्यांची पुनर्बांधणी, दुरुस्ती, रस्ते खोदणे ही कामे करण्याचे कंत्राट ज्या कंत्राटदारास किंवा कंपनीस देण्यात आले आहे, त्यांचे नाव, पत्ता व संपर्काबाबतचा तपशील कामाच्या ठिकाणी ठळकपणे लावण्यात येणार आहे. काम पूर्ण करण्याचा अंदाजित कालावधी आणि कामानंतर कोठून कोठपर्यंत रस्ता पूर्ववत करण्यात येणार हेही नमूद करावे लागेल.
समन्वय अधिकारी नेमणार
दृष्टीहिन व दृष्टीदोष असलल्या व्यक्तींना सहजपणे तक्रार करता यावी यासाठी तक्रार निवारण केंद्रात विशेष व्यवस्था करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
तक्रार निवारण केंद्रांबाबत विविध प्रसार माध्यमांतून वर्षभरात किमान तीन वेळा प्रसिद्धी द्यावी लागेल.
तक्रार स्वीकारणे आणि संबंधित अधिकाऱ्याकडे ती पोहोचविणे यासाठी प्रत्येक महापालिकेत एक समन्वय अधिकारी असेल.
नगरपालिका, नगर पंचायतींना रस्त्यांवरील खड्डे बुजविणे व एकूणच दुरुस्तीचा अहवाल दर तीन महिन्यांनी आयुक्त व संचालक नगरपालिका प्रशासन; मुंबई यांच्याकडे सादर करावा लागेल.
स्थानिक स्वराज संस्थांचीच जबाबदारी
रस्ते खड्डेमुक्त ठेवण्याची जबाबदारी ही स्थानिक स्वराज्य संस्थेचीच (महापालिका/नगरपालिका) असल्याचे नगरविकास विभागाने स्पष्ट केले आणि खड्डेमुक्तीबाबतचे आदेशही शनिवारी जारी केले. खड्डेमुक्तीची जबाबदारी शासनाची नाही, हे एक प्रकारे स्पष्ट करण्यात आले आहे.