‘जेट पॅचर ’ बुजविणार रस्त्यावरील खड्डे
By Admin | Published: March 26, 2015 10:53 PM2015-03-26T22:53:34+5:302015-03-26T22:53:34+5:30
पावसाळयात पडणारे खड्डे बुजविण्यासाठी केडीएमसी आता जेट पॅचर या आधुनिक प्रणालीचा वापर करणार आहे. यासाठी यंदाच्या अंदाजपत्रकात ३ कोटींची तरतूद करण्यात आली
कल्याण: पावसाळयात पडणारे खड्डे बुजविण्यासाठी केडीएमसी आता जेट पॅचर या आधुनिक प्रणालीचा वापर करणार आहे. यासाठी यंदाच्या अंदाजपत्रकात ३ कोटींची तरतूद करण्यात आली असून या मशिनचे काम कसे चालते? याचे प्रात्यक्षिक स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरूवारी डोंबिवली पश्चिमेतील आनंदनगरमध्ये पार पडले.
नागपूर आणि अमरावती महापालिकेत ही प्रणाली राबविण्यात आली आहे. या मशिनने रस्त्यावरील खड्डे खडी आणि डांबराच्या साहयाने बुजविले जाणार असून २ वर्षे ते उखडले जात नसल्याचा दावा आहे. या प्रणालीत हाय प्रेशर ब्लोअरच्या सहाय्याने खड्डयातील धुळ साफ केली जाते यानंतर या खड्डयात डांबराचे कोटींग करून त्यावर १० मी मी बाय ६ मी.मी.जाडीची खडी आणि डांबराचा थर हाय प्रेशरने दिला जातो. त्यामुळे हे मिक्सिंग खड्डयात घट्ट बसते. खडी आणि डांबराचे मिक्सिंग मशीनमध्येच होत असल्याने त्याचे प्रमाण समान राहते आणि रस्त्यावर त्याचा समांतर थर चढविला जातो. त्यामुळे हाताने बुजविलेल्या खड्डयामुळे निर्माण होणारा उंच सखल पणा यात रहात नसल्याचा दावा केला जात आहे. खड्डे किती भरले याची नोंद देखील होणार असून ४०० चौ मी परिसरातील रस्त्यावरचे खड्डे जेट पॅचरच्या साहयाने एका तासात भरता येणार आहेत. गुरूवारी पार पडलेल्या प्रात्यक्षिकाच्या वेळी सभापती म्हात्रेंसह शहरअभियंता पी.के उगले, कार्यकारी अभियंता दीपक भोसले आदी उपस्थित होते. महापालिका खड्डे बुजविण्याच्या कामासाठी दरवर्षी निविदा काढते.
या दुरूस्तीच्या कामांवर सुमारे १२ कोटींचा खर्च होतो. कोटयावधी रूपये खर्च करूनही खड्डयांची स्थिती पावसाळयात जैसे थे राहते. पावसाळयात डांबराचा प्लँट सुरू नसल्याने डांबराचा तुटवडा निर्माण होतो अशावेळी जेट पॅचर ही प्रणाली फायदेशीर ठरणार असल्याची माहीती म्हात्रे यांनी दिली. (प्रतिनिधी)