वडाळ्याच्या बीपीटी मार्गावरील तो खड्डा ठरत आहे धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:06 AM2021-07-27T04:06:52+5:302021-07-27T04:06:52+5:30
मुंबई : शिवडी-चेंबूर मार्गाला जोडणाऱ्या वडाळ्याच्या बीपीटी मार्गाची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे येथे ...
मुंबई : शिवडी-चेंबूर मार्गाला जोडणाऱ्या वडाळ्याच्या बीपीटी मार्गाची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे येथे नवीन खड्डेदेखील निर्माण झाले आहेत, परंतु या मार्गावर मागील काही दिवसांपासून एक भलामोठा खड्डा वाहनचालकांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. गणेश मंदिर ते दयाशंकर चौक दरम्यान असणारा हा सुमारे ३ फूट खोल असणारा खड्डा अनेक दुचाकीस्वारांच्या अपघाताचे कारण बनत आहे.
या मार्गावरून वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. या खड्ड्यात दररोज चार चाकी वाहनेही अडकतात. त्याचप्रमाणे दुचाकीस्वारदेखील या खड्ड्यात अडकून कोसळत आहेत. मात्र संबंधित प्रशासन या खड्ड्याकडे संपूर्णतः दुर्लक्ष करत आहे. रात्रीच्या वेळेस या मार्गावर अंधार असल्याने वाहनचालकांना या खड्ड्याचा अंदाज न आल्याने येथे दररोज अपघात होत आहेत. त्यामुळे एखादा मोठा अपघात होऊन एखाद्या व्यक्तीचा जीव गेल्यावरच संबंधित प्रशासनाला जाग येणार आहे का, असा प्रश्न सर्वसामान्य वाहनचालकांकडून उपस्थित होत आहे. त्यामुळे हा खड्डा लवकरात लवकर बुजवण्यात यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
फोटो आहे - खड्डा