अधिवेशनातील अनुपस्थिती चर्चेत असतानाच मनसेकडून मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र दौऱ्याचा प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 03:54 PM2021-12-23T15:54:48+5:302021-12-23T16:33:12+5:30
मुख्यमंत्री विधानसभेत जाणार असल्यामुळे वर्षा बंगला ते विधानभवन हा रस्ता खड्डे विरहित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री जर राज्य भर फिरले तर काय मज्जा येईल ना? pl, pl, pl राज्यभर दौरे कराल का? असा प्रश्न देशपांडे यांनी विचारला आहे.
मुंबई - महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीवरून भाजपने महाविकास आघाडी सरकारला घेरले आहे. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीची चांगलीच चर्चा रंगली असताना, पर्यावरणमंत्री आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री कधी सभागृहात कधी येणार आहेत, हे सांगितलंय. त्यामुळे, अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची हजेरी लागणार असल्याचं निश्चित झालंय. त्याच पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट केलंय.
मुख्यमंत्री विधानसभेत जाणार असल्यामुळे वर्षा बंगला ते विधानभवन हा रस्ता खड्डे विरहित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री जर राज्य भर फिरले तर काय मज्जा येईल ना? pl, pl, pl राज्यभर दौरे कराल का? असा प्रश्न देशपांडे यांनी विचारला आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन टीका करणाऱ्या भाजपला शिवसेनेचे नेते जशास तसं उत्तर देत आहेत. त्यातच, आता मनसेनं मुख्यमंत्री राज्यभर दौरे करतील का, असा प्रश्न विचारत लक्ष वेधले आहे. दरम्यान, तीन-चार दिवसांत मुख्यमंत्री विधिमंडळात दिसतील, असे संजय राऊत यांनी म्हटलंय.
मुख्यमंत्री विधानसभेत जाणार असल्यामुळे वर्षा ते विधान भवन हा रस्ता खड्डे विरहित करण्यात आला. असेच मुख्यमंत्री जर राज्य भर फिरले तर काय मज्जा येईल ना?pl, pl, pl राज्य भर दौरे कराल का?
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) December 23, 2021
मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी नाही. शस्त्रक्रिया झाली आहे. त्यांना काही पथ्य होती. ती पूर्ण झाली आहेत. विरोधकांनी या गोष्टीचा फार गाजावाजा करू नये. माणुसकी दाखवली पाहिजे. पुढच्या तीन चार दिवसात मुख्यमंत्री विरोधी पक्षांना दिसतील, ते सर्व कामकाजांवर लक्ष ठेवून आहे. आम्हीही पंतप्रधानांना संसदेत शोधत होतो. ते मला उत्तर प्रदेशात दिसले. परदेशात दिसले. पुतीन यांना मिठी मारताना दिसले. पण संसदेत दिसले नाहीत, असा टोलाही राऊत यांनी लगावला.