पिचड समर्थकांची राष्ट्रवादीत घरवापसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:06 AM2021-03-17T04:06:44+5:302021-03-17T04:06:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेल्या मधुकर पिचड यांच्या समर्थकांची मंगळवारी घरवापसी झाली. ...

Pitched supporters return home to the NCP | पिचड समर्थकांची राष्ट्रवादीत घरवापसी

पिचड समर्थकांची राष्ट्रवादीत घरवापसी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेल्या मधुकर पिचड यांच्या समर्थकांची मंगळवारी घरवापसी झाली. पक्षप्रवेशाच्या या सोहळ्यात अजित पवार आणि जयंत पाटील यांनी जोरदार राजकीय टोलेबाजी केली. आमचे सरकार नसते, तर तुम्ही पक्षात आला असता की नाही, हे माहिती नाही, असा टोला लगावतानाच हा तुमच्या आयुष्यातील शेवटचा पक्ष आहे लक्षात ठेवा, असा इशाराच पाटील यांनी यावेळी दिला.

पिचड समर्थक सीताराम गायकर यांनी आपल्या समर्थकांसह आज पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. यावेळी अजित पवार म्हणाले की, कोण जात असतं, येत असतात. आता फूट पाडण्याचा प्रयत्न होईल. त्याकडे लक्ष देऊ नका. आपल्या हिताचे काय? भावी पिढीच्या भवितव्याचे काय? हा विचार करा. काळजी करू नका, अंतर पडणार नाही. आता इकडे तिकडे जायचे नाही. वैभव पिचडला खूप समजावण्याचा प्रयत्न केला होता; परंतु काय झाले माहीत नाही त्याने पक्ष सोडला. ग्रामीण भागात काट्याने काटा काढायचा असतो ही म्हण प्रचलित आहे. त्यानुसार किरण लहामटे यांना उमेदवारी दिली आणि राष्ट्रवादीला आमदार मिळाला. आघाडीचे उमेदवार निवडून येण्यासाठी या जिल्ह्याने साथ दिली. आता एकोप्याने पुढे जायचे आहे. दुजाभाव करायचा नाही. सत्ता चालवताना अनुभवी लोक लागतात, असेही अजित पवार म्हणाले. त्याचसोबत नगर जिल्हा बँकेत काहींनी गंमत केली. कशी व कुणी केली हे मला माहीत आहे. थोडे दिवस जाऊदे नंतर बघतो एकेकाला, असा सज्जड दमच अजित पवार यांनी यावेळी भरला.

तर, आमचे सरकार नसते, तर तुम्ही पक्षात आला असता की नाही, हे माहिती नाही. मी याच ठिकाणी बसलो होतो. त्यावेळी कोणी थांबायला तयार नव्हते. मधुकर पिचड यांनी पक्ष का सोडला, हे अजूनही मला कळत नाही, असे सांगतानाच हा तुमच्या आयुष्यातील शेवटचा पक्ष आहे लक्षात ठेवा, असे जयंत पाटील यांनी व्यासपीठावरूनच सुनावले. सीताराम गायकर पक्षातून गेले होते असे कधी जाणवले नाही. आज आनंद झाला आहे. मालकीच्या घरात आलात, अशा आविर्भावात प्रवेश केला आहात. पिचड यांनी पक्ष सोडला त्यामुळे आम्हाला नवा कार्यकर्ता मिळाला आणि किरण लहामटे निवडून आले, असेही त्यांनी सांगितले.

सीताराम गायकर यांच्या नेतृत्वाखाली १२ संचालकांनी आणि अकोले तालुक्यातील सहकार क्षेत्रातील ७२ दिग्गज पदाधिकाऱ्यांनी यावेळी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.

Web Title: Pitched supporters return home to the NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.