Join us

खेळपट्ट्यांना मेट्रोचा तात्पुरता बसणार फटका

By admin | Published: October 06, 2015 3:36 AM

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो ३ मार्गाच्या बांधकामामुळे फोर्ट येथील ओव्हल मैदानावरील क्रिकेटसाठी तयार केलेल्या खेळपट्ट्या विस्थापित होणार नसल्याचे, एमएमआरसीएने

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो ३ मार्गाच्या बांधकामामुळे फोर्ट येथील ओव्हल मैदानावरील क्रिकेटसाठी तयार केलेल्या खेळपट्ट्या विस्थापित होणार नसल्याचे, एमएमआरसीएने स्पष्ट केले आहे. पण आझाद मैदानातील काही खेळपट्ट्या मेट्रोचे काम होईपर्यंत स्थलांतरित कराव्या लागणार असल्याने मेट्रो ३च्या कामाचा क्रिकेटपटूंना फटका बसणार आहे. क्रिकेटपटूंची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई मेट्रो रेल महामंडळ क्रीडा विभागाशी चर्चा करून जास्तीतजास्त खेळपट्ट्या उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे.या बांधकामामुळे ओव्हल आणि आझाद मैदानावरील खेळपट्ट्या विस्थापित होतील आणि मेट्रोच्या बांधकामामुळे दोन्ही मैदानांवरील खेळ बंद होईल, या भीतीपोटी क्रिकेटप्रेमींनी चळवळ सुरू केली आहे. पण एमएमआरसीएच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी दोन्ही मैदानांतील खेळावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ओव्हल मैदानाच्या ९ हेक्टरपैकी 0.३९ हेक्टर म्हणजेच ३ हजार ९00 स्क्वेअर मीटर इतकी जागा तात्पुरत्या स्वरूपात मेट्रो ३च्या बांधकामासाठी आवश्यक आहे. बांधकामासाठी मैदानातील केवळ ४ टक्के जागा आवश्यक असून, ही जागा ३ ते ४ वर्षांनंतर पुन्हा आहे तशी तयार करण्यात येईल. तसेच ही जागा मैदानाच्या उत्तरेकडील असल्यामुळे मैदानावरील क्रिकेटला बाधा पोहोचणार नसल्याचेही भिडे यांनी स्पष्ट केले आहे. आझाद मैदान हे २0 हेक्टर असून, या जागेपैकी केवळ ३.२७ हेक्टर म्हणजेच ३२ हजार ६८७ स्क्वेअर मीटर इतकी जागा मेट्रोच्या बांधकामासाठी आवश्यक आहे. संपूर्ण मैदानाच्या केवळ १६ टक्के जागा बांधकामासाठी आवश्यक असून, प्रेस क्लबमागील ही जागा बांधकामानंतर पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थितीमध्ये आणण्यात येणार आहे. आझाद मैदानातील काही खेळपट्ट्या स्थलांतरित कराव्या लागणार आहेत. मैदानातील ३२ हजार ६८७ चौ.मी. जागा बांधकामासाठी वापरण्यात येणार असल्याने १ लाख ६७ हजार ३१३ चौ.मी. जागा उपलब्ध राहणार असल्याचेही भिडे म्हणाल्या.हा मार्ग नरिमन पॉइंट, कफ परेड, फोर्ट, वरळी, लोअर परेल, बीकेसी, सीप्झ/एमआयडीसी परिसराशी जोडणार आहे.१२ महत्त्वपूर्ण शैक्षणिक संस्था, ११ हॉस्पिटल, ३0 सरकारी व खासगी कार्यालये त्याचप्रमाणे स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय विमानतळांशी जोडणार आहे.