मुंबई : मागील काही वर्षांपासून मुंबई महापालिकेने रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू केले आहे. मात्र, आता डांबरी रस्त्यांप्रमाणेच काँक्रीटच्या रस्त्यांवरही खड्डे पडू लागले आहेत. खड्डे बुजविण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करूनही पहिल्याच पावसात रस्त्यांवर हजारो खड्डे पडले आहेत. आठवडाभरात मुंबईतील खड्डे न बुजविल्यास मुंबई काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी गुरुवारी दिला.
मुंबई काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाई जगताप यांनी रस्त्यावरील खड्ड्यांवरून पालिकेवर निशाणा साधला. कोट्यवधी रुपये खर्च करूनही पहिल्याच पावसात हजारो ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले आहे. पालिकेच्या ॲपवर, अभियंत्यांच्या व्हॉट्सॲप तक्रारी केल्यानंतर महापालिकेकडून एक-दोन दिवसांत खड्डे बुजविले जात आहेत. याबाबतीत पालिका प्रशासनाने एका आठवड्याच्या आत कार्यवाही करावी, अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा भाई जगताप यांनी दिला.
भाई जगताप पुढे म्हणाले, मुंबई महापालिकेच्या मालकीच्या ज्या बीआयटी चाळी आणि इतर वसाहतीतील गाळेधारकांकडून २०१७ पासूनचा मालमत्ता कर आकारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मुळातच स्वतःच्या मालकीच्या मालमत्तेवर महापालिका मालमत्ता कर आकारू शकत नाही. तसेच या चाळींमध्ये राहणारे रहिवासी व गाळेधारक वर्षानुवर्षे महानगरपालिकेला भाडे देत आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या कराला काँग्रेसचा विरोध आहे. तब्बल ४६ हजार मध्यम आणि निम्न मध्यमवर्गीय कुटुंबांना या कराचा फटका बसणार आहे. हा कर तत्काळ रद्द करावा, अशी आमची मागणी असून यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनपा आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पत्र पाठविल्याचे जगताप यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस भाई जगताप यांच्यासह कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, मनपा विरोधी पक्षनेते रवी राजा, कोषाध्यक्ष भूषण पाटील, सहकोषाध्यक्ष अतुल बर्वे आणि सरचिटणीस संदेश कोंडविलकर उपस्थित होते.
पूरग्रस्तांना देणार दोन कोटींची मदत
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मुंबई काँग्रेसतर्फे २ कोटी रुपयांची अत्यावश्यक सामग्री आणि वैद्यकीय सेवा पुरविली जाणार आहे. यात साधारणपणे १० हजार ब्लँकेट्स, १० हजार चटई तसेच प्रत्येकाला एक किट देण्यात येईल ज्यामध्ये कपडे, मेडिकल किट, अन्यधान्य, गृहोपयोगी भांडी व संसाधने असणार आहेत. आमचे एक वैद्यकीय पथकसुद्धा तिथे जाणार आहे, असे भाई जगताप यांनी सांगितले.