मुंबई : शिवडी-चेंबूर मार्गाला जोडणाऱ्या बीपीटी मार्गावरील खड्डे डांबराऐवजी चक्क दगड मातीने बुजविले गेले आहेत. यामुळे वाहनचालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे बीपीटी मार्गावर खड्डे निर्माण झाले आहेत. परंतु या मार्गावर मागील काही दिवसांपासून एक भलामोठा खड्डा वाहनचालकांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. वडाळ्याच्या गणेश मंदिर ते दयाशंकर चौक दरम्यान असणारा हा सुमारे ३ फूट खोल असणाऱ्या खड्ड्यामुळे अनेक अपघात घडत आहेत.
ही समस्या लक्षात घेत लोकमतने मंगळवारी ‘वडाळ्याच्या बीपीटी मार्गावरील तो खड्डा ठरत आहे धोकादायक’ या मथळ्याखाली वृत्त प्रसारित केले होते.
मात्र, बुधवारी संबंधित प्रशासनाच्यावतीने दगड व माती टाकून हा खड्डा बुजविण्यात आला. डांबराऐवजी तात्पुरत्या स्वरूपात थातूरमातूर पद्धतीने हा खड्डा बुजविल्याने वाहनचालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या खड्ड्यातून दगड व माती पुन्हा एकदा बाहेर येऊन हा खड्डा खोल बनू शकतो व त्यामुळे अपघात होऊ शकतात, असे वाहन चालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे खड्डे बुजविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरत आहे.