हा घ्या पुरावा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांतील रस्ते पावसाळ्यात खड्डयांत गेले असून, मुंबईच्या पूर्व उपनगरातील कुर्ल्यातील छोट्या-माेठ्या रस्त्यांची चाळण झाली आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे कुर्ला पश्चिमेकडील बैल बाजारातील वाडिया कॉलनीमधील अभ्युदय बँकेसमोरील रस्त्यावर पडलेले भलेमोठे खड्डे. हे खड्डे मुंबई महापालिकेने चक्क माती आणि डेब्रिजने बुजविले आहेत. पावसामुळे यातील डेब्रिज, माती उखडल्याने रस्त्यावर आली आहे. त्यामुळे रस्त्यावर माती, चिखल, डेब्रिज पसरले असून, यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा सवाल आता स्थानिक करत आहेत.
लालबहादूर शास्त्री मार्गाला एक फाटा फुटून मगन नथुराम मार्ग बैल बाजारातून काळे मार्गाला जाेडला जातो. याच मगन नथुराम मार्गातून वाडिया कॉलनीसाठी एक रस्ता आत येतो. याच रस्त्यावर प्रारंभापासून अभ्युदय बँकेपर्यंत छोटे-मोठे खड्डे पडले आहेत. प्रारंभी पडलेला खड्डाच एवढा मोठा आहे की, येथे रस्ता कुठे आहे, तो शोधावा लागतो. हा खड्डा रिकामा असून, गेल्या कित्येक दिवसांपासून तो भरण्यात आलेला नाही. येथून पुढे गेल्यावर अभ्युदय बँकेच्या सुरुवातीला दोन मोठे खड्डे आहेत. हे दोन्ही खड्डे डेब्रिजने भरले आहेत. महत्त्वाचे म्हणजे येथूनच पुढे आणखी एक भलामोठा खड्डा पडला असून, तो माती आणि डेब्रिजने भरला होता. मात्र पावसामुळे यातील माती आणि डेब्रिज वाहून रस्त्यावर आले आहे. परिणामी रस्त्यावर चिखल पसरला असून, पादचाऱ्यांसह वाहनांंसाठी रस्ता धाेकादायक ठरला आहे, असे येथील स्थानिक राकेश पाटील यांनी सांगितले.
मुळात वाडिया कॉलनीमध्ये १७ इमारती आहेत. आसपास चाळी आहेत. ही मोठी वस्ती आहे. बैल बाजार आणि वाडिया इस्टेटमधील रहिवासी खड्डे पडलेला रस्ता रोज सातत्याने वापरत आहेत. येथेच बाजार भरताे. बाजारात खरेदी-विक्रीसाठी माेठ्या संख्येने ग्राहक येतात. आता काेराेना निर्बंधांमुळे सायंकाळी या रस्त्यावर कमी रहदारी असली तरी, सकाळी हा रस्ता माणसांनी भरून वाहत असतो. शिवाय वाहनांची वर्दळ असते. सदर रस्त्याची अवस्था दयनीय असल्याने माेठा अपघात घडल्यास मुंबई महापालिकेचा एल विभाग जबाबदारी घेणार आहे का? की एल वॉर्ड येथे काही विपरित घटना घडण्याची वाट पाहत आहात, असे सवाल स्थानिकांनी उपस्थित केले. शक्य तेवढ्या लवकर प्रशासनाने रस्ता व्यवस्थित करावा, अशी त्यांची मागणी आहे.
.............................................